भातशेतीवर समुद्राचे पाणी
By Admin | Updated: December 1, 2014 22:51 IST2014-12-01T22:51:45+5:302014-12-01T22:51:45+5:30
उरण तालुक्यात वशेणी ते केळवणे खाडीतील हजारो एकर पिकती शेतजमीन समुद्री बांधाला भगदाड पडल्याने नापीक होण्याचा धोका बळावला आहे.

भातशेतीवर समुद्राचे पाणी
उरण : उरण तालुक्यात वशेणी ते केळवणे खाडीतील हजारो एकर पिकती शेतजमीन समुद्री बांधाला भगदाड पडल्याने नापीक होण्याचा धोका बळावला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत असून हा बंधारा लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी उरणच्या आमदारांकडे केली आहे.
फुटलेल्या या बांधाची आमदार मनोहर भोईर यांनी नुकतीच अधिकाऱ्यांसह पाहणी केली असून हा बंधारा येत्या दोन ते तीन महिन्यात दुरुस्त करण्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली. दरम्यान, खारलँड प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागातील समुद्री बांधांना वरचेवर तडे जाण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शेतजमीन नापीक होत असून शासनाने समुद्री बांधाच्या फुटीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची ही पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरणार असल्याचे आमदार मनोहर भोईर यांनी जाहीर केले आहे.
महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किमीच्या समुद्र किनाऱ्यावर उरण आणि पनवेल तालुक्याच्या मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा आहे. या किनाऱ्यावर गावोगावच्या शेतकरी आपली एकबार पद्धतीची शेती करतात. अशाच प्रकारे शेती करणाऱ्या वशेणी व केळवणे गावच्या मधोमध असणाऱ्या भातशेतीवर गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक संकट कोसळले आहे.
समुद्राचे पाणी शेतीत घुसल्याने हजारो एकर शेतजमीन नापीक होण्याचा धोका बळावला आहे. समुद्राचे उधाणाचे सर्व खारे पाणी शेतीत शिरल्याने पुढील काही वर्षे येथील चांगले पीक ही घेता येणार नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतातुर झाले आहेत. या शेतक ऱ्यांनी केलेल्या विनंतीला मान देवून आमदार मनोहर भोईर यांनी या भगदाड पडलेल्या समुद्री बांधाची पाहणी केली.
मागील काही महिन्यांपासूनच हे समुद्री बंधाऱ्याला पडलेले भगदाड बुजविण्याचा प्रयत्न स्थानिक शेतकऱ्यांनी श्रमदानाने केला. मात्र भगदाड एवढे मोठे आहे की ते श्रमदानाने बुजवणे शक्य नाही. त्या अनुषंगाने आमदार भोईर यांनी थेट त्या फुटक्या बंधाऱ्याची पाहणी करून आमदार निधीतून तात्काळ दुरुस्त करण्याचे सूतोवाच केले आहेत. त्यामुळे केळवणे, वशेणी खाडीतील बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)