कागदी लगद्याच्या मूर्तींकडे मूर्तिकारांचा कल!; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 03:22 AM2018-08-01T03:22:02+5:302018-08-01T03:22:13+5:30

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पाद्यपूजन आणि पाटपूजन सोहळ्यांना सुरुवात झाली असून मुंबईकरांना गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे.

The sculptor of the pulp of the pulp! Call of Eco-friendly Ganeshotsav | कागदी लगद्याच्या मूर्तींकडे मूर्तिकारांचा कल!; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची हाक

कागदी लगद्याच्या मूर्तींकडे मूर्तिकारांचा कल!; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची हाक

googlenewsNext

मुंबई : मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पाद्यपूजन आणि पाटपूजन सोहळ्यांना सुरुवात झाली असून मुंबईकरांना गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. त्यात घरगुती गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांचा कल यंदा कागदी लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तींकडे असल्याचे दिसत आहे. म्हणूनच मूर्तिकारांनी पर्यावरपूरक गणेशोत्सवाची हाक देण्यास सुरुवात केली आहे.
भायखळ्यातील मूर्तिकार मंगेश सारदळ यांनी सांगितले की, शासनाच्या पर्यावरण विभागापासून महापालिका प्रशासनापर्यंत गणेशोत्सवात प्रत्येक पातळीवर पर्यावरण वाचवण्याची हाक दिली जाते. मात्र मूर्ती तयार केल्यानंतर कागदी लगदा आणि शाडूच्या मूर्तींची मागणी झाल्यास ती पूर्ण होणे अशक्य असते. म्हणूनच गणेशोत्सव सुरू होण्याच्या एक ते दोन महिने आधीपासून ही जनजागृती गरजेची आहे. हीच गरज ओळखून स्वत:च पुढाकार घेऊन भाविकांना शाडू आणि कागदी लगद्याच्या मूर्ती घेण्याचे आवाहन करत आहोत.
कागदी लगद्याच्या मूर्ती तयार करताना वर्तमानपत्राचा भुसा केला जातो. चपात्यांप्रमाणे हा लगदा वाटून गणेशमूर्तीच्या अवयवांप्रमाणे तो साच्यात बसवला जातो. अशा प्रकारे एकूण १० दिवसांच्या प्रक्रियेनंतर कागदाच्या लगद्याची दोन फुटी मूर्ती तयार होते. शाडूची मूर्ती तयार करतानाही मूर्तिकारांना बरीच खबरदारी घ्यावी लागते. पीओपी मूर्तींच्या तुलनेत कलाकारांना कागदी लगदा किंवा शाडूच्या मूर्ती तयार करताना अधिक खबरदारी तर घ्यावी लागतेच, शिवाय कलाकारांचे कसब पणाला लागते, असे मूर्तिकार ऋषिकेश पवार यांनी सांगितले.

विटंबना होत नाही
पीओपी मूर्तींच्या तुलनेत कागदी लगद्याच्या मूर्ती विसर्जनावेळी अवघ्या काही मिनिटांत पाण्यात विरघळतात. त्यामुळे पर्यावरणपूरक असलेल्या या मूर्तींची विटंबनाही टळते. तसेच पर्यावरणाची हानीही टळते.

जनजागृतीसाठी कुटुंबाची मदत
मूर्तिकार मंगेश सारदळ यांना या कामात त्यांची पत्नीही मदत करत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भाविकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सारदळ कुटुंबाने आधीच कागदी लगद्याच्या गणेशमूर्ती तयार करून त्यांचे प्रदर्शन सुरू केले आहे. कार्यशाळेपासून प्रदर्शन केंद्रापर्यंत कुटुंबातील एक व्यक्ती लोकांना या मूर्तींची माहिती देत आहे.

वजनाचे नो टेन्शन!
पीओपी मूर्तींच्या तुलनेत शाडूच्या मूर्ती अधिक वजनदार असतात. मात्र कागदी लगद्याच्या मूर्ती वजनाने पीओपी आणि शाडू या दोन्हींच्या तुलनेत अधिक हलक्या असतात. आश्चर्याची बाब म्हणजे एखादा १० वर्षांचा चिमुरडाही कागदी लगद्यापासून तयार केलेली दोन फूट उंचीची मूर्ती सहज उचलू शकतो.

प्रत्येक मूर्तिकाराने
धोका पत्करावा!
आज मूर्तिकारांनी पुढाकार घेऊन कागदी लगदा आणि शाडूच्या मूर्तींना प्रोत्साहन द्यायला हवे. या मूर्तींची किंमत पीओपी मूर्तींहून अधिक असली, तरी पर्यावरण हितासाठी हा धोका पत्करणे गरजेचे आहे. नाहीतर उद्या पीओपीच्या मूर्तींमुळे होणाºया प्रदूषणामुळे शासनाला विसर्जनासह मूर्तींवर बंदी आणावी लागेल. त्या वेळी बहुतेक मूर्तिकारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळेल. म्हणूनच या क्षेत्रातील रोजगार वाचवण्यासाठी भाविकांआधी मूर्तिकारांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी काही नुकसान सहन करावे लागले तरी त्याची तयारी मूर्तिकारांनी ठेवावी.
- मंगेश सारदळ, पर्यावरणप्रेमी मूर्तिकार

Web Title: The sculptor of the pulp of the pulp! Call of Eco-friendly Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई