बोर्डीतील गावदेवी रिक्षा स्टँड वादावर पडदा
By Admin | Updated: March 18, 2015 22:47 IST2015-03-18T22:47:49+5:302015-03-18T22:47:49+5:30
बोर्डीतील गावदेवी बस थांब्यानजीक रिक्षा उभ्या करण्यास नागरीकांनी हरकत घेतल्याने दोन दिवसापासून रिक्षाचालक विरूद्ध स्थानिक वाद चांगलाच पेटला होता.

बोर्डीतील गावदेवी रिक्षा स्टँड वादावर पडदा
बोर्डी : बोर्डीतील गावदेवी बस थांब्यानजीक रिक्षा उभ्या करण्यास नागरीकांनी हरकत घेतल्याने दोन दिवसापासून रिक्षाचालक विरूद्ध स्थानिक वाद चांगलाच पेटला होता. दरम्यान घोलवड पोलीस आणि बोर्डी ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नाने वादावर पडदा पडला आहे.
डहाणू बोर्डी सागरी महामार्गावरील बोर्डीतील गावदेवी बस थांब्याजवळ रिक्षा उभ्या करण्यावरून स्थानिक नागरीकांनी बोर्डी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. रिक्षा स्टँडमुळे मंदिरात जाण्यास भक्तांना तर घर गाठताना ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपासून वाद उफाळून आला. बुधवार १८ मार्च रोजी गावदेवी ते झाई, गावेवी ते बोरीगाव या मार्गावरील वीस रिक्षा चालकांनी सकाळी दहा ते बारा दोन तास आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे सदर मार्गावरील आदिवासी चाकरमानी, मच्छी विक्रेत्या महिला, शाळकरी विद्यार्थी यांना ताटकळत बसावे लागते. आंदोलनाची घटना समजताच बोर्डी ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल ठाकरे, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी लता चौधरी घटनास्थळी दाखल झाले. घोलवड पोलीसांनाही पाचारण करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर सरपंच कुणाल ठाकरे आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक डब्लू. जी. बांगर यांना समेट घडविण्यात यश आले. त्यानुसार या परिसरात फक्त पाच रिक्षा उभ्या करणे आणि शांतता व स्वच्छता टिक विण्याचे रिक्षा चालकांनी मान्य केले. (वार्ताहर)