Join us

राजावाडी रुग्णालयात आयसीयू समोरील भंगारामुळे उंदरांचा वावर, स्थायी समितीमध्ये तीव्र पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 21:46 IST

Mumbai Rajawadi Hospital : पालिका रुग्णालयातील या भयावह घटनेबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मुंबई - घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात उपचार घेणाऱ्या एक रुग्णाच्या डाव्या डोळ्याचा काही भाग उंदराने कुरतडल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. ठेकेदाराने आय.सी.यू समोर भंगार सामान ठेवल्याने उंदरांचा वावर वाढल्याचे कारण समोर आले. याची गंभीर दखल घेऊन पालिका प्रशासन आणि स्पष्टीकरण द्यावे असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहेत.

पालिका रुग्णालयातील या भयावह घटनेबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. येथील आयसीयू विभाग खासगीरित्या चालविणाऱ्या ठेकेदारांचा निष्काळजीपणामुळे उंदरांचा वावर वाढला. त्यामुळे या घटनेस ठेकेदार आणि प्रशासनाचाही हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी स्थायी समितीत केली. तर, त्या ठेकेदाराचे काम रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.या ठेकेदाराकडून आयसीयू विभाग पालिकेने आपल्या ताब्यात घेण्याची मागणी सदस्यांनी केली. 

ठेकेदाराचा निष्काळजीपणा रुग्णाच्या जीवावर बेतला?

राजावाडी रुग्णालयात असलेला आयसीयू विभाग क्रिटीकेअर या ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्यात आला आहे. मुंबईतील इतरही काही रुग्णालयातील अतिदक्षता विभाग ठेकेदारांमार्फत चालवले जातात. राजावाडी येथील अतिदक्षता विभाग तळमजल्यावर असून बाजूला भंगार ठेवण्यात आले आहे. या सामानाची अडगळ असल्याने येथे उंदरांचा वावर सुरु असल्याचे समोर आले आहे. मात्र अतिदक्षता विभागासमोर भंगाराचे सामान पडलेले असताना प्रशासन काय करीत होते ?  त्यांचे लक्ष नव्हते का? ठेकेदाराला हे सामान हलवण्यासाठी का सांगण्यात आले नाही, असे प्रश्न स्थायी समितीने उपस्थित केले आहेत.

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल