वेसावकरांसाठी ओरखडा?
By Admin | Updated: April 2, 2015 02:46 IST2015-04-02T02:46:53+5:302015-04-02T02:46:53+5:30
मुंबई महापालिकेच्या नियोजित विकास आराखड्यामुळे वेसावकरांची झोपच उडाली आहे. याचा मोठा फटका वेसावे कोळीवाड्यातील सुमारे २० हजार

वेसावकरांसाठी ओरखडा?
मनोहर कुंभेजकर, वेसावे
मुंबई महापालिकेच्या नियोजित विकास आराखड्यामुळे वेसावकरांची झोपच उडाली आहे. याचा मोठा फटका वेसावे कोळीवाड्यातील सुमारे २० हजार मूळ नागरिक असलेल्या कोळी बांधवांना बसणार आहे. यामुळे विकासाच्या नावाखाली वेसावे कोळीवाड्यातील जुन्या काळच्या वस्त्या आणि कोळीवाडाच उद्ध्वस्त होण्याची भीती कोळी समाजाचे गाढे अभ्यासक भगवान भानजी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
हा विकास आराखडा नव्हे, तर वेसावे कोळीवाडा उद्ध्वस्त करणारा हा ओरखडा आहे, असे भानजी म्हणाले. या विकास आराखड्यातील दोष दाखवून पुराव्यासह विस्तृत माहिती दिली.
वेसावे गावाचे मूळ नगर भूमापन १९६४ साली झाले होते. त्यानंतर वेसावे कोळीवाड्याचे पुनर्सर्व्हेक्षण कधीही झालेले नाही. ५० वर्षांची परिस्थिती आज राहिलेली नाही. नवा विकास नियोजन आराखडा तयार करण्यापूर्वी वेसावे कोळीवाड्याचे फेर नगर भूमापन होणे अत्यंत आवश्यक होते. तसेच सॅटेलाइट नकाशाचा आधार घेऊन विकास आराखडा तयार केला असता तर येथील करदात्या मूळ नागरिकांची घरे बाधित झाली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले.