स्काऊट्स गाईडचे विद्यार्थी करताहेत वर्गणी गोळा

By Admin | Updated: December 24, 2014 00:56 IST2014-12-24T00:56:27+5:302014-12-24T00:56:27+5:30

स्काऊट्स गाईडचे विद्यार्थी श्रमदानाऐवजी फक्त वर्गणी गोळा करत असल्यामुळे या शैक्षणिक उपक्रमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे

Scouts Gather's Student Collection | स्काऊट्स गाईडचे विद्यार्थी करताहेत वर्गणी गोळा

स्काऊट्स गाईडचे विद्यार्थी करताहेत वर्गणी गोळा

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
स्काऊट्स गाईडचे विद्यार्थी श्रमदानाऐवजी फक्त वर्गणी गोळा करत असल्यामुळे या शैक्षणिक उपक्रमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे. उपक्रम राबवताना शिक्षकांकडून मुलांना योग्य मार्गदर्शन झालेले नसल्याने हा प्रकार घडत आहे.
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स गाईड्स अंतर्गत विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी डिसेंबर महिन्यात विशेष उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाअंतर्गत पाचवी ते आठवीच्या मुलांना श्रमदान करायला सांगितले जाते. तर या श्रमदानातून जमा होणारा निधी हा शासनाकडे जमा केला जातो. त्यानुसार नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम राबवला जात आहे. त्याकरिता स्काऊट्स गाईडच्या मुला-मुलींकडे श्रमदानाची पत्रके देण्यात आलेली आहेत. या मुलांना समूहाने बालमजुरीत मोडत नसलेली घरगुती कामे करायची आहेत. त्यामध्ये धान्य निवडणे, स्वच्छता करणे, दळण आणणे अशा प्रकारच्या कामांचा समावेश आहे. या श्रमदानातून मिळणारा निधी जमा करुन त्याची नोंद पत्रकावर करायची आहे. उपक्रमाच्या अखेरीस संकलित झालेला हा निधी शाळेमार्फत शासनाकडे जमा केला जाणार आहे. परंतु श्रमदान करण्याऐवजी ही मुले वर्गणी गोळा करत असल्याचे दिसून येत आहे. परिसरात घरोघरी फिरुन शाळेच्या नावाने स्काऊट्स गाईडचे कार्ड दाखवून ही वर्गणी गोळा करत आहेत.
सानपाडा व कोपरखैरणे परिसरात अशी शालेय मुले आढळून आली आहेत. त्यामुळे स्काऊट्स गाईड्स या शैक्षणिक उपक्रमाचा मुलेच फज्जा उडवत असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात शालेय मुलांकडे चौकशी केली असता शाळेतूनच वर्गणी गोळा करण्याचे सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाच्या या उपक्रमाबद्दल शिक्षकांनाच गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.
मुलांनी श्रमदान टाळणे चुकीचे असल्याचे मत स्काऊट्स गाईड्सच्या जिल्हा सहाय्यक आयुक्त पुष्पलता पाटील यांनी व्यक्त केले आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी कष्टाऐवजी कोणत्याही प्रकारचा निधी घ्यायचा नाही. यामुळे श्रमदान करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Scouts Gather's Student Collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.