चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला कात्रीच
By Admin | Updated: June 10, 2015 02:52 IST2015-06-10T02:52:39+5:302015-06-10T02:52:39+5:30
बहुचर्चित अशा चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला अखेर कात्रीच लागल्याचे समोर आले. मेट्रो-३मुळे हा प्रकल्प वांद्रे किंवा अंधेरीपासून सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे.

चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला कात्रीच
मुंबई : बहुचर्चित अशा चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला अखेर कात्रीच लागल्याचे समोर आले. मेट्रो-३मुळे हा प्रकल्प वांद्रे किंवा अंधेरीपासून सुरू करण्याचा प्रयत्न असून, त्यावर काम सुरू असल्याची माहिती एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रकल्पाला कात्रीच लागल्याने तो आता कितपत यशस्वी होईल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
चर्चगेट रेल्वे प्रशासनाकडून २५ हजार कोटी रुपयांच्या चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासनाकडून दोन वेळा सर्वेक्षण करून त्याचा अहवालही तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारचीही जागा लागणार असल्याने त्यांचे सहकार्यही प्रकल्पात आवश्यक होते. परंतु भविष्यात मेट्रो-३चा होणारा प्रकल्प आणि एलिव्हेटेड प्रकल्पासाठी लागणारी जागा आणि अन्य तांत्रिक अडचणी पुढे करीत सहकार्य कराराला राज्य सरकारकडून सहकार्य देण्यात आले नाही. या सर्व वादविवादानंतर प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले. नुकतेच रेल्वे बोर्डाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून एलिव्हेटेड प्रकल्पासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली. त्यानंतर रेल्वेच्या चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला समांतर असा मेट्रो-३ कुलाबा-वांद्रे-सीप्झ प्रकल्प असल्याचे कारण पुन्हा पुढे करीत प्रकल्प वांद्रे किंवा अंधेरीपासून विरारपर्यंत नेण्याच्या सूचना करण्यात आल्या. अखेर एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) तयारी दर्शविण्यात आली. वांद्रे किंवा अंधेरीपासून प्रकल्प नेण्यासाठी त्यावर सर्व्हे केला जात असून, त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे सहाय यांनी सांगितले. या अहवालानंतर राज्य सरकारकडे बोलणी करणार असल्याचे सहाय म्हणाले.
अव्वाच्या सव्वा खर्च
चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाचा खर्च हा २५ हजार कोटी एवढा आहे. हा प्रकल्प २0१९पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र राज्य सरकार आणि रेल्वेची वेळोवेळी बोलणी फिस्कटत गेली. त्यामुळे प्रकल्प रखडल्याचे समोर आले.