Join us

गुजरातच्या धर्तीवर राज्यात सायन्स सिटी; ८ सदस्यीय समितीची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 06:27 IST

पश्चिम परिषदेच्या स्थायी समितीची तेरावी बैठक १५ एप्रिल रोजी गांधीनगर येथे झाली.

मुंबई: गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या सायन्स सिटीच्या पार्श्वभूमीवर लवकरच राज्यात सायन्स सिटी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नुकताच राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केला असून, यासाठी आठ सदस्यीस समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचा अभ्यासगट गुजरातमधील सायन्स सिटीला भेट देऊन त्याचा अहवाल महिन्याभरात शासनास सादर करणार आहे. त्यानंतर या सायन्स सिटीच्या स्थापनेला गती देण्यात येईल.

उत्कृष्ट सादरीकरण - पश्चिम परिषदेच्या स्थायी समितीची तेरावी बैठक १५ एप्रिल रोजी गांधीनगर येथे झाली. त्या बैठकीत उत्कृष्टकार्यपद्धतीबाबतचे सादरीकरण करण्यात आले. त्यात गुजरातने सायन्स सिटीबाबतचे उत्कृष्ट सादरीकरण केले होते. या सायन्स सिटीमध्ये विज्ञानाबाबत प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळे साहित्य ठेवण्यात आले आहे, अन्य उपकरणे विकसित करण्यात येत आहेत. यात देशभरातील विज्ञान संस्थांचा सहभाग आहे. त्यामुळे त्या धर्तीवरच महाराष्ट्रातही सायन्स सिटी उभारण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.

शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी मुख्य सचिव असून, त्यांच्यांतर्गत वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, नगरविकास • विभागाचे दोन प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव आणि नियोजन विभागाच्या प्रधान समावेश आहे.

टॅग्स :विज्ञान