शाळांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे

By Admin | Updated: June 19, 2015 00:27 IST2015-06-19T00:27:57+5:302015-06-19T00:27:57+5:30

नवीन पनवेल, पनवेल परिसरात स्कूल बस, व्हॅनमधून प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका उद्भवत आहे.

Schools should follow the rules of traffic | शाळांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे

शाळांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे

पनवेल : नवीन पनवेल, पनवेल परिसरात स्कूल बस, व्हॅनमधून प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका उद्भवत आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षेची जबाबदारी शाळांची असून, शासन आदेशानुसार प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करण्याची सक्ती करण्यात आली आहे. शाळा सुरू होण्याआधी झालेल्या संयुक्त बैठकीत आरटीओकडून परिसरातील सर्व शाळांना तसे निर्देश देण्यात आले आहेत.
पनवेल, कळंबोली, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, खारघर या परिसरात २३९ खाजगी शाळा आहेत. या शाळांची विद्यार्थी संख्या सुमारे १ लाख ६५ हजार आहे. बहुतांश शाळांमध्ये बस सुविधा आहे तर काही विद्यार्थी व्हॅनने येतात.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी काही नियमावली परिवहन विभागाने तयार केली असून त्यांच्या अर्टी, शर्थीचे पालन करण्याची हमी चालकांकडून घेण्यात आली आहे. मात्र अनेक स्कूल व्हॅनवाल्यांकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल परिवहन कार्यालयाकडून एका संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळा वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
बस आणि स्कूल व्हॅनमध्ये फायर एक्स्टिंग्शन बसवणे, अतिरिक्त विद्यार्थी वाहतूक थांबविणे, बारापेक्षा जास्त संख्या असल्यास सहाय्यक नियुक्त करणे, बारापेक्षा जास्त विद्यार्थिनी असल्यास महिला सहाय्यक नेमणे, स्कूल बसवर अनुभवी चालकाची निवड करणे यासारख्या अनेक उपाययोजना त्यांनी सुचवल्या. यावेळी परिवहन अधिकारी अरुण येवला, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत पाटील, गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे उपस्थित होते.
शाळा परिवहन समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक असतील. याशिवाय पालक, वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी, आरटीओ आणि पोलीस अधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या समितीत समावेश राहील. समितीच्या नियमित बैठका होऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना सुचवण्यात येतील, अशी माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)

विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित होते की नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त पाच भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ठाणे येथून दोन त्याचबरोबर पनवेल, पेण आणि परिवहन आयुक्त कार्यालयातून प्रत्येकी एक स्क्वॉड वाहतूक आणि सुरक्षितता न पाळणाऱ्या बस आणि स्कूल व्हॅनवर कारवाई करणार आहे.
- अनंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल.

Web Title: Schools should follow the rules of traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.