Join us  

मुंबईसह ८ महापालिका क्षेत्रांत उद्यापासून शाळा; काही ठिकाणी मात्र अजूनही तळ्यातमळ्यात सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 5:22 AM

पालकांच्या दबावामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असून, मुंबईसह राज्यातील ८ महापालिका क्षेत्रात सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : पालकांच्या दबावामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असून, मुंबईसह राज्यातील ८ महापालिका क्षेत्रात सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. मात्र, नागपूर, पुण्यासह अनेक महापालिकांच्या स्थानिक प्रशासनाचे तळ्यातमळ्यात सुरू आहे. पुण्यातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय आठवडाभरासाठी स्थगित करण्यात आला आहे. नागपूरमध्येही २६ जानेवारीनंतर परिस्थिती पाहून निर्णय होईल. 

मुंबई परिसरातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. हा निर्णय दोन दिवसांपूर्वीच झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व सहा महापालिका, दोन नगरपालिका व दोन नगरपंचायतींसह ग्रामीण जिल्ह्यातील २,७२८ शाळाही सोमवारी सुरू होणार आहेत. नाशिक, अकोला येथेही सोमवारी पुन्हा शाळांमध्ये मुलांचा किलबिलाट सुरू होईल. मालेगाव महापालिका क्षेत्रात शाळा सुरू झालेल्या आहेत. अकोल्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. मात्र, महानगरपालिका क्षेत्रातील शाळा १ फेब्रुवारीला सुरू होतील.

सुरू होण्याची प्रतीक्षा 

- पुणे (आठवडाभर स्थगित)- पिंपरी चिंचवड (आठवडाभर स्थगित)- नागपूर (निर्णय बाकी)- कोल्हापूर (२५ जानेवारी) - सांगली-मिरज-कुपवाड (३१ जानेवारी)- सोलापूर (शुक्रवारी बैठक)- वसई-विरार (२७ जानेवारी)- अकोला (१ फेब्रुवारी)- चंद्रपूर (उद्या बैठक) 

टॅग्स :शाळामुंबई