Join us  

शाळांना सीबीएसईचा बूस्टर तर मिळाला, पण...

By रेश्मा शिवडेकर | Published: March 11, 2024 9:03 AM

राज्य शिक्षण मंडळाऐवजी सीबीएसई, आयसीएसई, आयजीएसई संलग्नित शाळांमध्ये मुलांना शिकविण्याकडे पालकांचा कल वाढतो आहे.

रेश्मा शिवडेकर, विशेष प्रतिनिधी

राज्य शिक्षण मंडळाऐवजी सीबीएसई, आयसीएसई, आयजीएसई संलग्नित शाळांमध्ये मुलांना शिकविण्याकडे पालकांचा कल वाढतो आहे. परंतु या सर्वच शाळा खासगी असल्याने त्याचे शुल्क सर्वसामान्य, गरीब तर सोडाच; मध्यमवर्गीय पालकांनाही परवडत नाही. त्यामुळेच राज्य शिक्षण मंडळाच्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळांपाठोपाठ सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी या इतर शिक्षण मंडळांच्या शाळा सुरू करण्यावर मुंबई महापालिकेने भर दिला आहे. दिल्ली महापालिका शाळांच्या धर्तीवर मुंबई पालिकेने सुरू केलेल्या ‘मुंबई पब्लिक स्कूल’मुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही इतर बोर्डातील शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. मुंबईबरोबरच सध्या नवी मुंबई, संभाजीनगर, ठाणे या ठिकाणी महापालिकांतर्फे सीबीएसईच्या शाळा सुरू केल्या जात आहेत.

गेली काही वर्षे घटणाऱ्या मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थिसंख्या वाढविण्यासाठी सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई संलग्नित शाळा बूस्टर ठरत आहेत. सध्या सीबीएसईच्या १९, आयसीएसई, आयजीसीएसई आणि आयबी संलग्नित प्रत्येकी एक अशा २२ शाळा (एकूण मुले - ७,५११, मुलगे - ४ हजार, मुली - ३,५०७) पालिका चालवते. या शाळांमधील नर्सरी ते सहावीसाठीच्या एकूण ७,०९० जागांकरिता यंदा ११ हजारांच्या आसपास अर्ज आल्याने गेल्या वर्षीप्रमाणेच लॉटरी काढून प्रवेश करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता चार नवीन सीबीएसई शाळा येत्या वर्षात सुरू करण्याची घोषणा महापालिकेने केली आहे.

दुसरीकडे, विद्यार्थिसंख्येअभावी पालिकेच्या अनेक जुन्या (राज्य शिक्षण मंडळाशी संलग्नित) शाळा बंद होत आहेत. २०२२-२३ या वर्षात पालिकेच्या एकूण आठ माध्यमांच्या ९६४ प्राथमिक शाळा होत्या. या वर्षी ही संख्या ९४३ वर आली आहे. शाळांची संख्या कमी झाली असली तरी विद्यार्थिसंख्या मात्र नव्या सीबीएसई शाळांमुळे वाढली आहे. 

पालिका शिक्षणावर २०१२-१३ साली २,१३५ कोटी खर्च करत होती. २०२२-२३ मध्ये हा खर्च ५२ टक्क्यांनी वाढून ३,२४८ कोटींवर (प्रतिविद्यार्थी १ लाख २ हजार) गेला. २०२३-२४ मध्ये त्यात ४.५ टक्क्यांची वाढ करत आधुनिक शिक्षणाला अनुकूल ठरतील, अशा पायाभूत सुविधांवर बजेटमध्ये भर देण्यात आला आहे. 

अर्थात निव्वळ भौतिक सुविधा दिल्या म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत नाही. प्रयोगशील अध्ययन-अध्यापनाची जोड द्यावी लागते. त्यांच्यात अभ्यासाची आवड, सवय रुजवावी लागते. शाळांमध्ये ही जबाबदारी पार पाडणारा प्रशिक्षित शिक्षक हा दुवा मात्र पालिका शाळांमध्ये कमकुवत राहिला आहे.

शिक्षकांच्या गुणवत्तेचे काय? 

शिक्षकांच्या कमतरतेबाबत वारंवार आवाज उठविला गेल्यानंतर पालिकेने प्राथमिक शिक्षकांची १,३४२ पदे भरण्याकरिता प्रक्रिया सुरू केली. परंतु, शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा, अध्ययन-अध्यापनाच्या गुणात्मक दर्जाचा. राज्य शिक्षण मंडळ, सीबीएसई, आयजीसीएसईचा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्ययन-अध्यापन पद्धती तर सोडाच; परीक्षा, मूल्यांकन पद्धतीतही जमीन-अस्मानाचा फरक आहे. हा दर्जा राखला गेला नाही तर या शाळाही पालिकेच्या जुन्या शाळांच्याच वाटेने जायला वेळ लागणार नाही.

पालिकेच्या इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थी जास्त, शिक्षक कमी 

कोविडनंतर मुंबई महापालिका शाळांमधील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या २७ टक्क्यांनी, तर मुंबई पब्लिक स्कूलममधील संख्या ९० टक्क्यांनी वाढली. दुसरीकडे, जून २०२२ पर्यंत पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची ९५१ पैकी १४१ पदे रिक्त होती, तर मुंबई पब्लिक स्कूलमधील ८७३ पैकी ५३१ पदे रिक्त होती. माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती 

टॅग्स :शिक्षणशाळा