सुरक्षेबाबत शाळांची बेपर्वाई कायमच...!
By Admin | Updated: January 17, 2015 01:47 IST2015-01-17T01:47:50+5:302015-01-17T01:47:50+5:30
सुरक्षेबाबत शाळांची बेपर्वाई कायमच...!

सुरक्षेबाबत शाळांची बेपर्वाई कायमच...!
पेशावरला जे झाले ते मुंबईत होऊच शकत नाही, असा दृढ अतिआत्मविश्वास मुंबईतल्या शाळांना आहे. पेशावर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘टीम लोकमत’ने मुंबईतल्या निवडक शाळांमध्ये केलेल्या मेगा स्टिंग आॅपरेशनमधून शाळांची निष्काळजीपणाची भूमिका स्पष्ट झाली. शाळांमध्ये सहज प्रवेश मिळणे, सीसीटीव्ही असूनही ‘लोकमत’ प्रतिनिधींच्या संशयास्पद हालचालींवर प्रशासनाकडून काहीच हालचाली न होणे या गंभीर बाबी स्टिंगमधून समोर आल्या आहेत. दहशतवादाचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे सुरक्षेची जबाबदारी फक्त पोलीस किंवा अन्य सुरक्षा यंत्रणांवर सोपवून चालणार नाही. तर प्रत्येक व्यक्तीने, संस्थेने सतर्क राहायला हवे. खबरदारीचे उपाय योजायलाच हवेत ही जाणीव करून देणे हा ‘टीम लोकमत’चा या स्टिंग आॅपरेशनमागील हेतू...
मेन गेटवरील सुरक्षा कशी होती?
नाम बडे दर्शन छोटे... असा काहीसा अनुभव पवईतील एस.एम. शेट्टी शाळेत आला. शाळेबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात होते. पण त्यांना नेमकी माहिती नसल्याचे दिसून आले. शाळेत प्रवेश करतेवेळी अॅडमिशनचे कारण सांगताच आमच्याकडे कुठल्याही प्रकारची चौकशी अथवा तपासणी न करता थेट चौथ्या माळ्यावर सोडण्यात आले.
शाळेत काय आढळले?
‘लोकमत’च्या दोन प्रतिनिधींनी सावधपणे चौथ्या माळ्यावरील कार्यालयाजवळ गेले. तेव्हा प्रत्येक माळ्यावर एक सुरक्षारक्षक आढळून आला. संंशयित हालचाली करूनही सुरक्षारक्षकाने विचारणा केली नाही. १० मिनिटे थांबून सुरक्षारक्षकांच्या नजरेसमोर शाळेच्या मागच्या बाजूने बाहेर पडलो, तेव्हा आम्हाला कोणीही हटकले नाही. सीसीटीव्हीचे मॉनिटरिंग होत नसल्याचे या वेळी दिसून आले.
सहज प्रवेश; बॅगकडे दुर्लक्ष
अॅण्टोनी डिसुझा शाळा, भायखळा, पूर्व
सुरक्षा रक्षकाशी संवाद साधल्यावर सहज प्रवेश मिळाला. यानंतर प्रतिनिधींनी शाळेत बॅग ठेवली.
संशयास्पद बॅग असूनही विद्यार्थी आणि शिक्षकांकडून दुर्लक्षित राहिली.
मेन गेटवरील सुरक्षा कशी होती?
अॅण्टोनी डिसुझा हायस्कूल जवळ पावणेनऊच्या सुमारास पोहचलो तेव्हा गेटवर शिशुवर्गातील विद्यार्थ्यांची आणि पालकांची गर्दी होती. ९ वाजेपर्यंत गर्दी कमी झाल्यावर एक प्रतिनिधी पुढे गेला. सुरक्षा रक्षकाला सांगितले की, शाळेत प्रवेश घेण्यासंदर्भात चौकशी करायची आहे. कार्यालयात जायला सांगितल्यावर इतर प्रतिनिधी त्याच्याबरोबर आत गेले. ओळखीचा दाखला मागितला नाही, नाव लिहून घेतले नाही. तसेच आमच्याकडील बॅगचीही तपासणी केली नाही़
डॉन बॉस्को शाळा, माटुंगा
वेळ - आत स. १२.४४ - बाहेर १२.५९
मेन गेटवरील सुरक्षा व्यवस्था कशी?
मध्य मुंबईतली टॉपची शाळा अशी ओळख असलेल्या माटुंग्याच्या डॉन बॉस्कोत कोई भी आओ घर तुम्हारा... अशी धक्कादायक परिस्थिती दिसून आली. मुख्य प्रवेदशद्वारावर एकच मरतुकडा सुरक्षारक्षक होता. जो आत येणाऱ्या वाहनांना थांबवून किरकोळ विचारपूस करत होता. पायी येणाऱ्या-जाणाऱ्यांना मात्र त्याने पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. कुठून आलात, कोणाला भेटायचे आहे, काय काम आहे हे प्रश्न सोडाच पण सोबत आणलेल्या बॅगाही तपासण्याची तसदी तो घेत नव्हता. हीच संधी सोधून ‘लोकमत’चे दोन प्रतिनिधी थेट शाळेत शिरले.
ंशाळेत काय आढळले?
शाळेत शिरताना त्यांनी आपल्याकडे बॅगा आहेत याची जाणीव त्यासुरक्षा रक्षकाला करून दिली. पुढे त्यांनी संपूर्ण शाळा पालथी घातली. त्यांना कोणीही हटकले नाही. शाळेच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या स्टॉलवर त्यांनी आपल्याकडील बॅग सोडली आणि शाळेतून बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी पुन्हा सुरक्षारक्षकाशी संवाद साधून आपल्याकडे बॅग नाही हे दाखवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकाला त्याची जाणीव झाली नाही. पुढे ‘लोकमत’चा तिसरा प्रतिनिधी आत शिरला. तो बेवारस अवस्थेत पडलेली बॅग बाहेर घेऊन आला. त्यानेही येताना-जाताना सुरक्षारक्षकाशी संवाद साधला होता. त्याच्याकडे जाताना बॅग नव्हती, येताना होती हे मात्र सुरक्षारक्षकाच्या अखेरपर्यंत लक्षात आले नाही.
राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी
वेळ - आत दु. १.०१ - बाहेर १.२९
मेन गेटवरील सुरक्षा व्यवस्था कशी?
डॉन बॉस्कोप्रमाणेच दादर, हिंदू कॉलनीतली राजा शिवाजी शिक्षण संकुलातही ‘लोकमत’ प्रतिनिधींना सहज प्रवेश मिळाला. मुख्यप्रवेशद्वारावर ना कोणी रोखले ना कोणी टोकले. शाळेत काय आढळले? : सहज प्रवेश मिळाल्यामुळे प्रतिनिधी पूर्ण शाळा फिरले. मैदानाशेजारील कॅन्टिनमध्ये सोबत आणलेली सॅक संशयास्पदरित्या सोडून ते शाळेबाहेर पडले. कॅन्टिनमध्ये विद्यार्थी, पालक व कर्मचाऱ्यांची गर्दी होती. मात्र बेवारस बॅगेबाबत कोणाच्याही मनात पाल चुकचूकली नाही. १५ मिनिटांनी ‘लोकमत’चा तिसरा प्रतिनिधी ती सॅक बाहेर घेऊन आला.
आर्मी पब्लिक स्कूल, कुलाबा
वेळ - आत स. ११.१५ - बाहेर ११.३४
मेन गेटवरील सुरक्षा कशी?
कुलाबा येथील आर्मी पब्लिक स्कूलच्या प्रवेशद्वारावर बंदुकधारी लष्काराच्या जवानासह एका खासगी संस्थेचा सुरक्षा तैनात करण्यात आला होता. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आता प्रवेश करतानाच खासगी सुरक्षा रक्षकाने दोन्ही प्रतिनिधींनी हटकले. शालेय प्रवेशाची माहिती घेण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधायचा आहे, असे सुरक्षा रक्षकाला प्रतिनिधींनी सांगितले. परंतू यावेळेला तुम्हाला शाळेत प्रवेश मिळणारच नाही, असे उत्तर सुरक्षा रक्षकाने दिले. शिवाय तुम्ही लष्कराशी संबधित आहात की सर्वसामान्य नागरिक आहात? असा प्रतिप्रश्नही त्याने केला. त्याच्या प्रश्नावर उत्तर देताना आम्ही पुन्हा आम्हाला केवळ शालेय प्रवेशाची माहिती घ्यावयाची आहे, असे ठासून सांगितले. तरीही प्रवेशद्वारावरच त्याने आम्हाला रोखून धरत यावेळेला प्रवेशाची माहिती मिळणारच नाही, असे ठणकावून सांगितले. आणि तुम्ही लष्कराशी संबधित आहात की सर्वसामान्य नागरिक आहात? असा यापूर्वीच विचारलेला प्रश्न पुन्हा
केला. त्यावर मात्र आम्ही सर्वसामान्य नागरिक असून, दोन मिनिटांचे काम असल्याचे सांगत आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
परंतू यावेळी मात्र बंदुकधारी लष्करी जवान आमच्यासमोर येऊन उभा ठाकला. त्यानंतर मात्र दोन प्रतिनिधींपैकी केवळ
एका प्रतिनिधीला त्याने मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश दिला. त्याचवेळी दुसरा प्रतिनिधीही आत प्रवेश करत असताना त्याला त्याची बॅग मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवण्यास सांगण्यात आले. प्रवेश देतेवेळी नोंदवहीत नोंद करण्यास सांगितले. शिवाय नोंद करण्यापूर्वी ओळखपत्रदेखील तपासले आणि कोणतीही साहित्य आत घेवून जाण्यास मज्जाव केला.
शाळेत काय आढळले?
प्रशासनाशी बोलणी करण्यापूर्वी लगतच्या उद्यानात एक प्रतिनिधी फिरकत असताना पुन्हा येथील एका सजग कर्मचारी वर्गाने त्याला हटकले. आणि काय काम आहे? असा प्रतिप्रश्न केला. यावर त्यालाही पुन्हा शालेय प्रवेशाची माहिती घेण्यासाठी आलो आहोत, असे सांगितले. दरम्यान येथील एका महिला कर्मचारी वर्गानेदेखील प्रतिनिधीवर तीक्ष्ण नजर टाकत आपला रस्ता धरला. शालेय प्रवेशाची माहिती घेवून दोन्ही प्रतिनिधी पुन्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी दाखल झाले. येथे उभ्या असलेल्या लष्करी जवानाकडे नौदलाच्या शाळांत कसा प्रवेश मिळतो; अशी विचारणा केली. यावर मात्र तो उखडला आणि म्हणला, ‘मै आर्मी मॅन हू. मुझे सिर्फ आर्मी के बारमे पुछना. नेव्ही के बारमे वहाँ जाकर पुछिये. यहाँ नही.’ असे प्रतित्त्युर दिले. तर दुसरीकडे खासगी सुरक्षानेदेखील ‘मेने जो कहा था वही जबाव मिला ना’ असे म्हणत आम्हाला बाहेरचा रस्ता दाखविला.