Join us
Daily Top 2Weekly Top 5

दप्तरांसाठी शाळेतच लॉकर : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे होणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 02:34 IST

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी अनेक वेळा विविध स्तरांवर मागण्या झाल्या. महापालिकेने टॅबच्या माध्यमातून डिजिटल मार्गाने हे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी अनेक वेळा विविध स्तरांवर मागण्या झाल्या. महापालिकेने टॅबच्या माध्यमातून डिजिटल मार्गाने हे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, टॅबची सुविधा इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळाली. प्राथमिक वर्गातील विद्यार्थी मात्र, आजही पुस्तकांनी गच्च भरलेल्या दप्तराच्या ओझ्याखाली वाकत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांनी भरलेले आपले दप्तर ठेवण्यासाठी, शाळेतच लॉकरची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आता पुढे आली आहे. त्यानुसार, दप्तरांसाठी शाळेतच लॉकर ठेवण्याचा ठराव पालिका महासभेत मांडण्यात येणार आहे.शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकांचे दप्तर हे त्यांच्या पालकांसाठी नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे, याकडे लक्ष वेधत, भाजपाच्या नगरसेविका सेजल देसाई यांनी महापालिकेच्या, तसेच सर्व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी लॉकरची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. परिणामी, त्यांच्या दप्तराचे ओझे कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.पालिका महासभेच्या पटलावर हा ठराव मांडण्यात येणार असून, त्याला मंजुरी मिळाल्यास ही सूचना आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाविद्यार्थी