Join us  

शाळा रुग्णालयाच्या भूखंडातून ४७६ कोटी रुपयांची कमाई; MMRDA काढणार निविदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 4:51 AM

वडाळा अधिसूचित क्षेत्रातील भूखंडवाटप

मुंबई : वडाळा ट्रक टर्मिनसच्या जागेचा बीकेसीच्या धर्तीवर विकास करण्याचा एमएमआरडीएचा मानस असून इथल्या निवासी क्षेत्रात रुग्णालय आणि शाळेसाठीचे भूखंड लवकरच वितरित केले जाण्याची चिन्हे आहेत. १४ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या दोन भूखंडांच्या माध्यमातून एमएमआरडीएच्या तिजोरीत किमान ४७६ कोटी रुपये जमा होतील, असा अंदाज आहे.

वडाळा ट्रक टर्मिनलची जमीन ही मुंबई शहरालगत असून सभोवतालच्या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे या ठिकाणी ट्रक टर्मिनल कार्यान्वित ठेवल्यास मुंबईच्या प्रदूषणात भर पडेल आणि वाहतूक कोंडीची समस्या आणखी जटिल होईल, अशी भीती आहे. त्यामुळे हे टर्मिनल मुंबई शहराबाहेर स्थलांतरित करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.

हे वाहनतळ मानखुर्द किंवा मुंबई शहराबाहेर स्थलांतरित करावे आणि बीकेसीच्या धर्तीवर कमर्शियल सेंटर म्हणून या भागाचा विकास करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी एमएमआरडीएने सल्लागारामार्फत या भागाचा सुधारित विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसारच पुढील काम करण्याचे नियोजित आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारने १६ सप्टेंबर, २०१९ रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार एमएमआरडीएने नियोजन सुरू केले आहे. शाळा आण् िरुग्णालयाचे हे भूखंड निविदा मागवून वितरित केले जाणार आहेत. प्राधिकरणाच्या आगमी बैठकीत त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढिल प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.एक चौरस मीटरसाठी ८१ हजार ८१८ रुपये दरवडाळा अधिसूचित क्षेत्रात निवासी सुविधा असलेल्या भागात रुग्णालयासाठी ७ हजार ३५ चौरस फूट क्षेत्रफळाचा भूखंड उपलब्ध आहे. तिथे प्रचलित नियमावलीनुसार ४२ हजार ६०२ चौरस मीटर एवढे बांधकाम शक्य आहे. तर, शाळेसाठी ८१५० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला भूखंड उपलब्ध आहे. तिथे १५ हजार ७१४ चौरस मीटर क्षेत्रफळाएवढे बांधकाम शक्य आहे. या भागात यापूर्वी प्रति चौरस मीटर बांधकाम क्षेत्रासाठी ८१ हजार ८१८ रुपये इतका दर प्राप्त झालेला आहे. तो दर आधारभूत धरून भूखंडवाटपाचे नियोजन आहे. त्यानुसाररुग्णालयाच्या भूखंडासाठी किमान ३४८ कोटी तर, शाळेच्या भूखंडासाठी १२८ कोटी रुपयांचे उत्पन्न अभिप्रेत आहे.

टॅग्स :एमएमआरडीए