स्वच्छता मोहिमेसाठी शाळांची सुटी रद्द
By Admin | Updated: September 30, 2014 00:59 IST2014-09-30T00:59:05+5:302014-09-30T00:59:05+5:30
शिक्षक दिनानिमित्त सर्व शाळांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण दाखविण्याच्या सक्तीवरून वाद निर्माण झाला होता.

स्वच्छता मोहिमेसाठी शाळांची सुटी रद्द
>मुंबई : शिक्षक दिनानिमित्त सर्व शाळांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण दाखविण्याच्या सक्तीवरून वाद निर्माण झाला होता. यास काही दिवसांचा कालावधी उलटत नाही, तोच केंद्र सरकारमार्फत 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी गांधी जयंतीनिमित्तची सर्व शाळांची सुटी रद्द करण्याचे फर्मान शालेय शिक्षण विभागाने जारी केल्याने याला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला आहे.
शाळांची सुटी कायम ठेवून ही मोहीम 31 ऑक्टोबरच्या कालावधीत राबविण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून राज्यात ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी मुलांना शाळेत जावे लागणार आहे. या मोहिमेनुसार शाळेतील वर्गाची, आवाराची, स्वच्छतागृहाची सफाई करावी लागणार आहे. याबाबतचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने शाळांना पाठविले असून, या पत्रनुसार गांधी जयंतीची सुटी रद्द केली आहे. त्यामुळे शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार, 25 ते 31 सप्टेंबर या कालावधीत ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ ही मोहीम राबवावी, असे म्हटले आहे. तरीही गांधी जयंतीदिनी शाळांची सुटी रद्द करून शाळा भरविणार आहेत. (प्रतिनिधी)
च्शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. गांधी जयंतीदिनी शाळांची सुटी रद्द करू नये, अशी मागणी पाटील यांनी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे केली आहे. ही मोहीम 31 ऑक्टोबरच्या कालावधीत राबविण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.