शाळा इंग्रजी माध्यमाची ‘लूक’ मात्र मराठीच
By Admin | Updated: April 18, 2015 23:13 IST2015-04-18T23:13:54+5:302015-04-18T23:13:54+5:30
एकीकडे पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब पुरविण्याच्या गप्पा मारल्या जात आहेत. तसा प्रस्तावही तयार करण्याच्या हालचाली सुरु आहेत.

शाळा इंग्रजी माध्यमाची ‘लूक’ मात्र मराठीच
जितेंद्र कालेकर ल्ल ठाणे
एकीकडे पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब पुरविण्याच्या गप्पा मारल्या जात आहेत. तसा प्रस्तावही तयार करण्याच्या हालचाली सुरु आहेत. तर दुसरीकडे पालिकेनेच सुरु केलेल्या शाळा क्रमांक तीन या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब सोडा संगणकही हाताळायला मिळालेला नाही. त्यामुळे आधी पूर्ण सुविधा द्या, मग टॅब पुरवा, अशीच माफक अपेक्षा पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे.
सावरकरनगर येथील शाळा क्र. १०८ मधून लोकमान्यनगर पाडा क्र. दोन येथे शाळा क्रमांक तीन मध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेची सुरुवात पालिका प्रशासनाने केली. पालिकेने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केल्यामुळे मध्यमर्गीय कामगारांच्या मुलांनाही या शाळेचा आधार मिळाला. पटसंख्याही झपाटयाने वाढली. सुधारणांच्या बाबतीत ही शाळा ‘टिपिकल’ मराठी शाळेप्रमाणेच मागासलेली राहिल्याने तिथे संगणकांपासून बेंचेसपर्यन्त अनेक उणीवा आहेत.
दहा वर्षांपूर्वी सावरकरनगर येथे शाळा क्र. १०८ ही मराठी शाळा भरायची. त्याच शाळेचे रुपांतर कालांतराने इंग्रजी शाळा क्र. तीनमध्ये झाले. त्यामुळे लोकमान्यनगर, इंदिरानगर, यशोधननगर, चैतीनगर, शास्त्रीनगर, सावरकरनगर आणि करवालोनगर या परिसरातील विद्यार्थी या शाळेत येतात. पालिकेने इंग्रजी माध्यमाच्या ज्या पाच शाळा सुरु केल्या त्यापैकीच ही एक शाळा. २०१३ पासून ती शाळा क्र. ४६ च्याच इमारतीमध्ये सकाळच्या सत्रात भरते. त्यामुळे सकाळी इंग्रजी आणि दुपारी मराठी माध्यमाचे विद्यार्थी येथे शिकतात.
या शाळेत स्वतंत्र मुख्याध्यापकाची गरज असूनही ते पद भरलेच गेलेले नाही. त्यामुळे प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून अलकनंदा साळुंखे याच कारभार पाहतात. साळुंखे यांच्यासह ११ शिक्षक इथे आहेत. ज्युनिअर के. जी., सिनिअर के. जी, पहिली ते आठवी पर्यन्तचे वर्ग इथे आहेत. आठवीचा वर्ग गेल्या शैक्षणिक वर्षापासून सुरु झाला आहे. सातवीच्या दोन तुकडया वगळता पहिली ते सहावीपर्यन्त प्रत्येकी एक तुकडी आहे. प्रत्येक वर्गात ३५ ते ४० विद्यार्थी असून शाळेची पटसंख्या ३२५ आहे.
गेल्यावर्षी ३०० च्या घरातील संख्या यंदा ३२५ झाली आहे. पटसंख्या वाढली. परंतु, शाळेचा भार मराठी माध्यमाच्या शाळेवरच अवलंबून असल्यामुळे तिथे अपुरे बेंचेस आहेत. किमान १०० वाढीव बेंचेसची येथे आवश्यकता आहे. फर्निचरही नाही. मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत संगणक वर्ग तर इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत संगणकांचा पत्ताच नाही. त्यामुळे एकीकडे पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब पुरविण्याच्या गप्पा मारल्या जात असतांना या विद्यार्थ्यांना संगणक हाताळायलाही मिळत नाही.त्यामुळे नुसती इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु झाली. पण सुविधा मात्र अपुऱ्याच अशी अवस्था आहे. शाळेचे नुतणीकरणाचे कामही अपुरे असल्यामुळे दुसऱ्या मजल्यावर वर्गांची संख्या जास्त असूनही तिथे स्टाईल्स लागलेल्या नाहीत.
या शाळेच्या इमारतीचे भूमीपूजन २५ आॅक्टोंबर २००५ मध्ये तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक, राज्याचे वित्तमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. मराठी माध्यमाच्या मानाने या शाळेत माध्यमिकचे अर्थात आठवीचे वर्गही वेगाने सुरु करण्यात आले. पण अपुऱ्या सुविधांमुळे पालक आणि विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांमध्येही नाराजी आहे. एका वर्गात तर फरशीही नाही. त्यामुळे मोठा गाजावाजा करुन इंग्रजी शाळा पालिका प्रशासनाने सुरु केली असली तरी त्यांना सुविधा देतांना हात आखडता घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.