Join us  

शाळा बंद करणारे गद्दार! मराठी वाचवायची असेल तर मराठी शाळा वाचवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 5:51 PM

मुंबईतील 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी नरे पार्क ( परळ ) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मराठी माध्यमाच्या पालकांच्या महासंमेलनाची आयोजनपूर्व बैठक मालाड येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या उत्कर्ष मंदिर या शाळेत पालकांच्या मोठ्या उत्साहात पार पडली.

- किशोर पाठक

मुंबईतील 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी नरे पार्क ( परळ ) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मराठी माध्यमाच्या पालकांच्या महासंमेलनाची आयोजनपूर्व बैठक मालाड येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या उत्कर्ष मंदिर या शाळेत पालकांच्या मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी मुलांना इंग्रजी माध्यमात घालून आम्ही त्यांना घरी मराठी शिकवू ही भूमिका फसवी असून मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल असा सूर  मराठी माध्यमाच्या पालकांच्या महासंमेलनाची आयोजनपूर्व बैठकीत उमटला. त्यानिमित्ताने...

प्रत्येक माणूस मातृभाषेत वाढतो. जर तो खरंच तसा वाढला तर त्याला त्या भाषेत बोलायला लाज वाटत नाही. कुठेही, कुठल्याही देशात उदा. बंगाली, कानडी मुलं; ते एकमेकांना भेटले तर त्यांच्या भाषेत बोलतात. त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान शिकवावा लागत नाही. मग तो मराठी मुलांना का शिकवावा लागतो. कारण इंग्रजाळलेले आईबाप, स्टेटसच्या अवास्तव कल्पना, पैशांच्या माजापायी मराठी मुलांना ‘कॉन्व्हेंट’ नावाच्या मायाजाळात अडकवणे, त्यांना पैसा आणि इंग्रजी संवर्धन महत्त्वाचे. मग आपली मराठी माणसं मेलीत काय? ते का नाही मराठी शाळा कमी पैशांत चालवू शकत? जे सरकार मराठी भाषिक मराठी शाळा बंद करताहेत ते सुरीबहाद्दर, गद्दार आहेत. मराठी शाळेत इंग्रजी, गणित, शास्त्र हे विषय इंग्रजीत शिकविता येतात. 

महाराष्ट्राला मराठी शाळेत शिकून परदेशात पराक्रम गाजविणा-यांचा इतिहास आहे. ते इंग्रजी शिकले, गरज म्हणून पण मराठीत जगून जर शासन मराठी शाळा जगविणार नसतील तर जगातील मराठी भाषिक एकत्र येऊन मराठी शाळांच्या मागे उभे राहतील. मराठी शाळा फुलतील कारण त्यात मराठी स्त्रिया शिकवतात. त्या कष्टाळू, हुशार, शिस्तीच्या असतात. त्यांना डावलणे हा गुन्हा आहे. तुम्हाला मराठी वाचवायची असेल तर मराठी शाळा वाचवा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात एक प्रचंड मुलांनी भरलेली किमान एक मराठी शाळा हवीच. हा प्रयत्न झाला तरच आपली मराठी जगेल. जगभरातल्या बांधवांना त्यानिमित्ताने आवाहन आहे.(लेखक हे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी उपाध्यक्ष आहेत.) 

टॅग्स :शाळा