Join us  

स्कूलबसमध्ये गियरऐवजी बांबूचा वापर; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 9:04 AM

अपघातानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस

मुंबई: स्कूलबसमध्ये गियरऐवजी बांबूचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सांताक्रूझमधील पोदार शाळेच्या बसमध्ये गियरऐवजी बांबूचा वापर करण्यात येत होता. गेल्या तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचं पोलीस चौकशीतून समोर आलं. एका अपघातानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या प्रकरणी खार पोलिसांनी स्कूलबसच्या चालकाला ताब्यात घेतलं. मात्र त्याची जामीनावर सुटका झाली. खारमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या कारला पोदार शाळेच्या बसनं धडक दिली. त्यावेळी व्यावसायिकानं बसचा पाठलाग केला. यानंतर त्याला बसच्या गियरऐवजी बांबू वापरला जात असल्याचं दिसून आलं. त्यानं या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर खार पोलिसांनी बस चालक राज कुमारला (21 वर्षे) ताब्यात घेतलं. गियर बॉक्समध्ये तीन दिवसांपूर्वी बिघाड झाला. मात्र दुरुस्तीसाठी वेळ मिळत नसल्यानं बांबूचा वापर केल्याचं राज कुमारनं पोलिसांना सांगितलं. यानंतर त्याच्यावर कलम 279 (बेदरकारपणे वाहन चालवणे) आणि कलम 336 (जीव धोक्यात घालणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.खार पूर्वेतील मधू पार्क परिसरात पोदार शाळेच्या बसनं एका व्यावसायिकाच्या बीएमडब्ल्यू कारला धडक दिली. त्यानंतर त्यानं पाठलाग करुन बस अडवली. 'गाडीला धडक देणाऱ्या बस चालकाशी माझा वाद झाला. त्यावेळी बसमध्ये गियरऐवजी बांबूचा वापर असल्याचं मी पाहिलं. त्यानंतर मी पुरावा म्हणून या प्रकाराचं चित्रीकरण केलं,' अशी माहिती व्यावसायिकानं दिली. बसचालक राज कुमारचा परवाना उत्तर प्रदेशातील असल्याचं तपासातून समोर आलं आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती पोदार शाळा प्रशासनाला कळवली आहे. 

टॅग्स :शाळाबसचालक