Join us  

कोरोनामुळे शिवरायांच्या पादुकांचा होणार डोक्यावरून प्रवास; पालखी सोहळ्याचे वेळापत्रक घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 6:31 AM

प्रस्थान २८ जूनला

मुंबई : रायगडाहून पंढरीतील विठोबाच्या भेटीस दरवर्षी जाणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान २८ जून रोजी सकाळी ९ वाजता रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज समाधी मेघडंबरी पासून होणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीमुळे शिवरायांच्या पादुका चक्क डोक्यावर घेऊनच केवळ ५ शिवभक्त धारकरी रायगडवरून पंढरीस जाणार आहेत. 

रायगडाहून प्रस्थान केल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पादुकांचा पहिला विसावा पाचाडमधील जिजाऊ मांसाहेबांच्या समाधी छत्रीजवळ असेल. आऊसाहेबांचा आशीर्वाद व निरोप घेऊन सोहळा पहिल्या मुक्कामी पळसगाव खुर्दमधील मारुती मंदिरात येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा मुक्काम श्रीरामपूरमध्ये करून सोहळा तिसऱ्या दिवशीच्या मुक्कामास ३० जून रोजी ऐतिहासिक ताम्हिणी घाटातील जुन्या पाऊलवाटेने पुणे जिल्ह्याच्या सीमेवर मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावात येईल. तेथून मजलदरमजल करत शिवाजी महाराज ४ जुलैला तुकोबारायांच्या पालखी मार्गावर सामील होण्यासाठी पुण्यनगरीत दाखल होतील.

ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज व शिवाजी महाराज यांच्या भेटीचा उत्सव हडपसरला ५ जुलैला पार पडून मग पालखी सोलापूर महामार्गाने भाळवणी मार्गे आषाढ शुद्ध दशमी, १९ जुलैला पांडुरंगाच्या दर्शन ओढीने पंढरपुरात मुक्कामी पोहचेल. शिवरायांच्या पादुकांचा परतीचा प्रवास द्वादशीलाच वाहनाने होऊन केवळ तीनच मुक्कामात पालखी २३ जुलैला पुन्हा रायगडी दाखल होईल. 

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजमहाराष्ट्र