मुंबई : पंचशील नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात तब्बल ८० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आशापुरा ग्रुपचे संचालक आणि भागीदारांविरोधात टिळक नगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. चेतन भानुशाली, प्रवीण चामरिया, माया हिकमत उडान, मीना भानुशाली, धनजी पटेल, लक्ष्मीबेन पटेल आणि बेचर पटेल यांचा संशयितांमध्ये समावेश आहे.
तक्रारदार चैतन्य मेहता हे ‘अरिहंत रिअल्टर्स’चे भागीदार आहेत. अरिहंत रिअल्टर्सने २००८ मध्ये पंचशील नगर एसआरए प्रकल्प राबवायला घेतला होता. यामध्ये ८०० हून अधिक झोपडीधारक आहेत. प्रकल्पासाठी सर्व अधिकृत मंजुरी घेतल्यानंतर २०११ मध्ये आशापुरा ग्रुपला ६५ टक्के भागीदार म्हणून सहभागी करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे कक्ष १४ चे सहायक पोलिस निरीक्षक योगेश भद्रे करीत आहेत.
अशी झाली अफरातफरकरारानुसार निधी उभारणे, मंजुरी मिळविणे आणि व्यवस्थापनाची जबाबदारी आशापुरा ग्रुपवर होती. मात्र, त्यांनी पीएनबी हाउसिंग फायनान्सकडून मिळालेला निधी चुकीच्या माहितीच्या आधारे स्वतःच्या फायद्यासाठी वळविला. तसेच, खरेदीदारांकडून मिळालेली रक्कम अधिकृत खात्यांऐवजी अन्यत्र वळविण्यात आली. प्रकल्पासाठी तयार केलेल्या पीएमसी संस्थेचे संचालकही आशापुरा ग्रुपशी संबंधित असल्याचे उघड झाले. त्यांच्या वाढीव बिलांच्या माध्यमातून १८ कोटींची मागणी करण्यात आली. शिवाय, २०० बनावट कर्जदार तयार करून १४० कोटी रुपये देय दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.