सयाजीरावांचा दस्तऐवज खुला होणार
By Admin | Updated: April 7, 2016 01:30 IST2016-04-07T01:30:25+5:302016-04-07T01:30:25+5:30
महाराज सयाजीराव गायकवाड यांची ‘व्हेरी सिक्रेट ए बँडेड बॉक्स केस’ ही फाइल लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीत साठ वर्षे बंद होती. बंद फायलीतील हा इतिहास ‘स्वातंत्र्यलढ्याचे

सयाजीरावांचा दस्तऐवज खुला होणार
स्रेहा मोरे , मुंबई
महाराज सयाजीराव गायकवाड यांची ‘व्हेरी सिक्रेट ए बँडेड बॉक्स केस’ ही फाइल लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीत साठ वर्षे बंद होती. बंद फायलीतील हा इतिहास ‘स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे सयाजीराव गायकवाड’ या पुस्तकाद्वारे मूळ कागदपत्रांसह लवकरच इतिहासतज्ज्ञ आणि वाचकांसमोर येणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक आणि प्रकाशक बाबा भांड यांनी ही मूळ कागदपत्रे लंडनहून मायदेशी आणली आहेत.
‘स्वातंत्रलढ्याचे पाठीराखे सयाजीराव गायकवाड’ हे पुस्तक बाबा भांड यांनी ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार घेऊन लिहिलेले आहे. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात आतापर्यंत संशोधकांनी सयाजीराव गायकवाड यांच्या भूमिकेकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. सयाजीरावांच्या अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी केलेली मदत ब्रिटिश सरकारला आवडत नव्हती. यामुळे सयाजीरावांमागे गुप्तहेर लावण्यात आले.
हा गोपनीय अहवाल गव्हर्नर जनरलकडून लंडनला पाठवण्यात आला. तो लंडन येथील ब्रिटिश लायब्ररीत गेली साठ वर्षे बंदिस्त होता. आतापर्यंत सर्वांनी दुर्लक्षित केलेला हा इतिहास या पुस्तकातून पुढे आला आहे. महाराज सयाजीराव यांच्या चरित्राचे व कर्तृत्वाचे विविध पैलू बाबा भांड यांनी चरित्र, कादंबरी, किशोर कादंबरी अशा विविध माध्यमांतून विशद केले आहेत.
ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर औरंगाबाद शहरात शुक्रवार ८ एप्रिल
रोजी सायंकाळी ५.३० वाजता या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या वेळी ‘साकेत बुकवर्ल्ड’ हे
नवे ग्रंथदालनही सुरू करण्यात
येणार आहे. ५०० पानांचे
ऐंशी खंड शक्य
महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या समग्र साहित्याचे प्रकाशन व्हावे, असे स्वप्न आहे. हे ऐतिहासिक काम झाल्यास ५०० पानांचे ऐंशी खंड तयार होऊ शकतील एवढे मौलिक दस्तऐवज बडोदा पुराभिलेख, महाराजांचा खानगी दप्तरखाना येथे पडून आहेत. हा हिंदुस्थानातील कल्याणकारी राजाचा मौलिक ऐतिहासिक-सांस्कृतिक ठेवा आहे. या अक्षर वाङ्मयाचे संपादन, प्रकाशन करणे हे राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण, जतन आणि संवर्धन करणे हे सांस्कृतिक राष्ट्रीय कार्य होईल. यासाठी दूरदृष्टीच्या प्रशासक आणि दक्ष कारभाऱ्याच्या मदतीची गरज आहे.
- बाबा भांड, ज्येष्ठ साहित्यिक