सावंतवाडी -युवतीची ‘इन कॅमेरा’ चौकशी
By Admin | Updated: August 18, 2014 23:30 IST2014-08-18T22:59:41+5:302014-08-18T23:30:35+5:30
अत्याचार प्रकरण : खास चौकशी पथक सावंतवाडीत

सावंतवाडी -युवतीची ‘इन कॅमेरा’ चौकशी
सावंतवाडी : गेले चार दिवस सावंतवाडीत दबक्या आवाजात चर्चेत असलेल्या युवतीच्या अत्याचार प्रकरणात अखेर अप्पर पोलीस अधीक्षिका विनिता साहू यांनी स्वत: लक्ष घातले असून, चौकशी अधिकारी म्हणून महिला पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. या महिला अधिकाऱ्याने आज, सोमवारी सावंतवाडीत दाखल होत या युवतीची तब्बल आठ तास ‘इन कॅमेरा’ चौकशी केली. हा चौकशी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे विनिता साहू यांनी सांगितले.
फोंडाघाट (ता. कणकवली) येथील सतरा वर्षीय युवती शिक्षणाच्या उद्देशाने गेली दहा वर्षे सावंतवाडीत राहत आहे. सध्या ती संगणकीय अभ्यासक्रम शिकत आहे. याच काळात तिची फेसबुक व व्हॉट्स अॅपवरून अनेक युवकांशी ओळख झाली. या ओळखीतून अनेक वेळा पार्ट्यांच्या निमित्ताने मित्रांचे तिच्या रूमवर येणे-जाणे होते. त्यातून तिला वेगवेगळी आमिषे दाखवून शहरातील काही युवकांनी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. हे प्रकरण १४ आॅगस्टला ही युवती शहरातील मोती तलावाच्या काठावर फिरताना पोलिसांना आढळून आल्यानंतर उजेडात आले. त्यानंतर युवतीला येथील महिला अंकुर केंद्रात ठेवण्यात आले.
परंतु युवतीची किंवा तिच्या कोणत्याही नातेवाइकाची याबाबत तक्रार नसल्याने पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केला नव्हता. अखेर राजकीय पक्षांनी पोलिसांना निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केल्यानंतर काल, रविवारी अप्पर पोलीस अधीक्षिका विनिता साहू यांनी या प्रकरणाची दखल घेत उपनिरीक्षक दर्जाच्या महिला अधिकारी एच. ब्रह्मिष्टे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली. एच. ब्रह्मिष्टे यांनी आज, सोमवारी सावंतवाडीत दाखल होत येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने महिला अंकुर केंद्रात जाऊन युवतीचा ‘इन कॅमेरा’ जबाब नोंदविला. या प्रकरणात शहरातीलच युवकांचा एक गट सहभागी असून, सर्व युवक बड्या धेंडांची तसेच राजकीय पक्षाच्या नेत्यांची मुले असल्याचे पुढे येत आहे. पोलिसांनी मात्र या चौकशीबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. (प्रतिनिधी)
युवतीची तक्रार; गुन्हा दाखल होणार
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार रात्री उशिरा युवतीने चौकशी अधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबात आपल्यावर वेळोवेळी अत्याचार झाल्याची कबुली दिली असून, काही युवकांची नावेही दिली आहेत. त्यावरून रात्री उशिरा किंवा उद्या, मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.