मोहीम किल्ले वाचविण्याची!

By Admin | Updated: October 21, 2014 23:20 IST2014-10-21T23:20:22+5:302014-10-21T23:20:22+5:30

दिवाळी सणाला सुरूवात होण्याआधीपासूनच बालदोस्तांना वेध लागतात ते दिवाळीत किल्ले बनविण्याच्या उद्योगाचे.

Save the campaign forts! | मोहीम किल्ले वाचविण्याची!

मोहीम किल्ले वाचविण्याची!

पनवेल : दिवाळी सणाला सुरूवात होण्याआधीपासूनच बालदोस्तांना वेध लागतात ते दिवाळीत किल्ले बनविण्याच्या उद्योगाचे. बालदोस्तांच्या मनात केवळ किल्ले बनविणे म्हणजे खेळ एवढेच सीमित असले तरी स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या ऐतिहासिक अशा किल्ले जगताबाबत जागृती आणि किल्ल्यांचे रक्षण करण्याबाबत उत्सुकता निर्माण करण्याकरिताच स्पर्धांचे आयोजन केले जात असून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
शिवरायांनी राज्याचा गड राखण्याकरिता आणि रयतेचा कारभार सक्षमपणे चालविण्याकरिता भक्कम असे दुर्ग उभारले. त्यांचे अनेक वर्षे रक्षण केले. काळाच्या ओघात त्यांची पडझड झाली असली तरीही कित्येक वर्षांनंतरही या गड, दुर्गांचे अस्तित्व पाहिले तर त्यांच्या कणखरपणाबाबत आजही इतिहास अभ्यासकांना, प्रेमींना आश्चर्यच वाटते. या गड- किल्ल्यांची माहिती त्यांच्या आवडीच्या खेळातून त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याकरिता विविध भागातून संस्था प्रयत्न करीत आहेत. त्यानिमित्ताने दिवाळीच्या दिवसात खास स्पर्धाही आयोजित केल्या जात आहेत. याबाबत माहिती देताना गड- किल्ल्यांचे अभ्यासक संजय लोकरे म्हणाले की, दरवर्षी आम्ही या किल्ले बनविण्याच्या स्पर्धांचे आयोजन करतो. त्यातून आजच्या मुलांपर्यंत गडांचे महत्त्व पोहोचावे व गड बांधण्याकरिता किती श्रम खर्ची झाले याची माहिती मिळावी हाही हेतू आहे.
फोटोग्राफीच्या माध्यमातून गड- किल्ल्यांच्या माहितीत भर घातलेले योगेश शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली. या केवळ स्पर्धा नाहीत तर भविष्यातील नागरिकांना ऐतिहासिक वास्तूचे मोल पटविण्याची ही संधी आहे. त्यातच फोटोग्राफीच्या माध्यमातून भर घालत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Save the campaign forts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.