Join us  

'सावरकर हे तेजस्वी सूर्य, राहुल गांधींनी देशवासियांची माफी मागावी'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 10:21 AM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेले विधान अतिशय निंदनीय आहे.

मुंबई - दोन जन्मठेपेच्या शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशासाठीचे बलिदान राहुल गांधींना कळूच शकत नाही. त्यांच्या त्यागाची किंमत राहुल यांना काय कळणार? सावरकरांचा त्यांनी अपमानच केला आहे, पण असा अपमान होताना कालपर्यंत तावातावाने बोलणारी शिवसेना आता काय बोलणार? असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावकरांवरील वक्तव्यावरुन काँग्रेस अन् शिवसेनेला लक्ष्य केले. तर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन राहुल गांधींच्या विधानाचा निषेध केला. तसेच, राहुल गांधींनी माफी मागावी, असेही ते म्हणाले. 'काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेले विधान अतिशय निंदनीय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे तेजस्वी सूर्य आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सावरकरांनी केलेला त्याग आम्हा भारतवासियांना ज्ञात असून, त्याची जाणीव आम्हाला आहे. राहुल गांधींनी संपूर्ण देशवासियांची जाहीर माफी मागावी!', असे ट्विट पाटील यांनी केले आहे. 

दरम्यान, फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाहीत. स्वत:ला ‘गांधी’ समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये. केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी ‘गांधी’ होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. शिवसेनेने पूर्वीच्या भूमिका बदलल्या तर त्यांचा धाक कमी होईल का ते माहिती नाही पण विश्वासार्हता आजच कमी होतेय ती हळुहळू संपेल.

राहुल गांधी यांनी दिल्लीतील रामलीली मैदानावरील भारत बचाव रॅलीला संबोधित करताना, माझं नावी राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे. मी मरेन पण माफी मागणार नाही, असे म्हणत भाजपा नेत्यांना सुनावले  होते.  

टॅग्स :चंद्रकांत पाटीलराहुल गांधीभाजपाशिवसेनादेवेंद्र फडणवीस