Join us  

बाळराजेंचा 'मूड' गेला, महाराजांनी 'धागा' दिला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 10:42 AM

महाराज, खड्ड्यांची भीती नाही हो. आता सवयच झालीय त्याची. महालाबाहेर पडलं की दादरच्या गडावर पोहोचेपर्यंत हाडं पार खिळखिळी होतात.

- ज्योतिर्मय टोमणे

बाळराजे आदिनाथ जरा घुश्श्यातच राजवाड्यात प्रवेशकर्ते झाले आणि सगळ्यांचेच धाबे दणाणले.

त्यांच्या आगमनाची वर्दी महाराज उद्धारराव (ते सतत 'मित्रा'चा उद्धार करत असतात) आणि 'मातोश्रीं'ना देण्यासाठी द्वारपाल तडक दरबाराच्या दिशेनं धावले, तोच नवरत्नांपैकी एक प्रधान 'घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद' गुणगुणत बाहेर येताना दिसले. बाळराजेंचा 'मूड' गेल्याचं द्वारपालाने त्यांना सांगितलं. तशी दरबाराची रीतच होती. कुठलीही गोष्ट महाराजांपर्यंत जाण्याआधी प्रधानांच्या कानावर घालायची आणि ती त्यांच्या लेव्हलवर सुटली नाही तर मग महाराजांपर्यंत न्यायची. 

हा विषय नाजूक होता. प्रधानांनी बाळराजेंच्या खोलीत हळूच डोकावून पाहिलं तेव्हा, हवा गेल्यावर टायर जसा दिसतो, तसाच त्यांचा चेहरा झाला होता. त्यामुळे प्रधानांनी ही बाब तडक महाराज आणि मातोश्रींना सांगितली आणि सगळेच बाळराजेंच्या कक्षाकडे निघाले. 

उद्धाररावः काय झालं बाळराजे? नाशिक संस्थानाहून परतल्यानंतर आपला चेहरा अचानक आपल्या 'काकासाहेबां'सारखा रागीट का झालाय? 

बाळराजेः राग नाही येणार तर काय होणार महाराज? तुमच्यापर्यंत बातमी पोहोचलेली दिसत नाही अद्याप!

मातोश्रीः अहो बाळराजे, खड्ड्यांमुळे टायर फुटल्याच्या बातमीबद्दल बोलताय का? (बाळराजे मानेनंच होकार देतात) ती तर प्रधानांनी लगेचच सांगितली आम्हास. आपली ख्यालीखुशाली कळली, अन्य वाहनाने आपण निघाल्याचा निरोपही मिळाला आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. 

उद्धाररावः अरे आपण मर्द मावळे आहोत, खड्ड्यांची आपल्याला कसली भीती?

बाळराजेः महाराज, खड्ड्यांची भीती नाही हो. आता सवयच झालीय त्याची. महालाबाहेर पडलं की दादरच्या गडावर पोहोचेपर्यंत हाडं पार खिळखिळी होतात. त्यातून थोडा रिलिफ मिळावा म्हणूनच नाशिक संस्थानला जाण्याचा घाट घातला, पण घोटीत घात झाला. 

उद्धाररावः घात?... कसला घात, कुणी केला घात?

बाळराजेः घात नाही तर काय?... काकासाहेबांनी दाखवलेल्या नाशिक संस्थानच्या प्रेझेन्टेशनमध्ये चकाचक रस्ते दिसले होते. मग, हे खड्डे आले कुठून?

उद्धाररावः पावसाळा आला की खड्डे आलेच. मुंबई संस्थानातही पावसामुळेच खड्डे पडतात की. 

बाळराजेः हो, ते खरेच. खड्ड्यांना पाऊस जबाबदार आहेच, पण हा खड्डा कुणीतरी जाणीवपूर्वक खणला असावा, असा आम्हास संशय वाटतो.

उद्धाररावः तुमचा रोख आपल्या 'खास मित्रा'कडे - 'कमल'नाथाकडे तर नाही.

बाळराजेः अर्थातच. खेकड्याप्रमाणे पाय ओढणारे काही कमी आहेत का आपल्याकडे?

(खेकडा हा शब्द ऐकून बाजूच्या कक्षातून तेजस्वीराजे धावत येतात.)

तेजस्वीराजेः कुठे आहे खड्ड्यातला खेकडा?... खड्ड्यात वाढणाऱ्या खेकड्यांच्या प्रजातीवर संशोधन करायचंच होतं मला... 

मातोश्रीः धाकले बाळराजे, शांत व्हा आणि या खेकड्यापासून तुम्ही थोडं लांबच राहा. 

बाळराजेः खेकडे पुराण पुरे. आमच्या वाटेत आलेला हा खड्डा आणि त्यामुळे फुटलेला टायर, हा प्रादेशिक संस्थानांना रोखण्याच्या 'कमल'नाथाच्या धोरणाचाच तर भाग नाही ना, अशी शंका आमच्या मनात येते. सध्या नाशिक संस्थान त्यांच्याच ताब्यात आहे ना! त्यावर काहीतरी ठोस तोडगा शोधून काढणे आवश्यक आहे महाराज. 

(महाराज हसत हसत आपल्या कक्षात जातात. सगळेच गोंधळून एकमेकांकडे पाहू लागतात. इतक्यात उद्धारराजे बंद मुठीत काहीतरी घेऊन येतात. बाळराजेंपुढे ती मूठ उघडतात.)

उद्धारराजेः बाळराजे, हे घ्या! हा नुसता धागा नाही, हे बंधन आहे. फाटाफूट रोखण्यासाठी आम्ही हे बंधन आमच्या शिलेदारांच्या मनगटावर बांधलं होतं. आपण ते आपल्या टायरला बांधा. मग कुठलाही खड्डा तुमचा टायर फोडू शकणार नाही. 

(महाराजांचे हे आत्मविश्वासाने भरलेले उद्गार ऐकून सगळेच भारावतात. बाळराजे धागा घेऊन धावत-धावत बाहेर जातात. एक वेगळंच बळ मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. त्यामुळे राजवाडा सुखावतो आणि तुतारी वाजते.)  

ता. क. महाराजांच्या काळात खड्ड्यांवर काही तोडगा निघेल असं दिसत नाही. त्यामुळे आपण आपले अवयव शाबुत राखण्यासाठी असाच कुठला धागा मिळतो का, हे पाहिलेलं बरं.

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेराज ठाकरेआदित्य ठाकरे