सरींनी भिजला दर्शन सोहळा...

By Admin | Updated: September 1, 2014 04:42 IST2014-09-01T04:42:17+5:302014-09-01T04:42:17+5:30

श्री गणेशाच्या भक्तीत मुंबापुरी तल्लीन झाली असतानाच २४ तास पडलेल्या सरींनी अवघा दर्शन सोहळा अक्षरश: भिजून गेला.

Sari celebrates the ... | सरींनी भिजला दर्शन सोहळा...

सरींनी भिजला दर्शन सोहळा...

मुंबई : श्री गणेशाच्या भक्तीत मुंबापुरी तल्लीन झाली असतानाच २४ तास पडलेल्या सरींनी अवघा दर्शन सोहळा अक्षरश: भिजून गेला. रविवारच्या सुटीची संधी साधत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेला गणेशभक्त मुंबईकर सरींंची तमा न बाळगता आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी दिवसभर नतमस्तक होत असल्याचे चित्र होते.
शनिवारची रात्र आणि रविवारची सुटी असा ताळमेळ साधत कोसळणाऱ्या मुसळधार पावसात गणेशभक्त दक्षिण आणि मध्य मुंबईकडे रवाना होत होता. पावसाची रिमझिम सुरू असतानाही केवळ गणेशाच्या भक्तीपायी मंडपाकडे वाट चालू लागलेल्या या भक्ताच्या ओठांवर केवळ आणि केवळ ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...’ असा जयघोष सुरू होता. उपनगरीय लोकलमधून परळ, करी रोड, चिंचपोकळी आणि भायखळा या रेल्वे स्थानकांवर रविवारच्या पावसात उतरणाऱ्या गणेशभक्तांची गर्दी उत्तरोत्तर वाढतच होती. लालबागच्या राजाच्या दर्शनाने भारावलेला गणेशभक्त त्यानंतर गणेश गल्ली, तेजुकायाचा राजा, रंगारी बदक चाळ, चिंचपोकळीचा चिंतामणी, नरे पार्कचा राजा आणि अगदीच वेळ मिळाला तर मग खेतवाडी असा प्रवास करीत श्रींचे दर्शन घेत होता.
सकाळपासून सायंकाळपर्यंत डोईवर कोसळणारा पाऊस, श्री गणेशाच्या दर्शनासाठी लांबच लांब लागलेली रांग, लोकलमधली धक्के आणि बुक्के देणारी गर्दी असे सारे काही सहन करीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यांपेक्षाही आकर्षक अशा गणेशमूर्ती पाहूनच गणेशभक्त भारावून जात होता. श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर माथ्यावर लागलेला गुलाल आणि हातावर पडलेल्या दोन साखरेच्या दाण्यांनंतर त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. विशेषत: लालबागच्या राजाच्या गर्दीत होणाऱ्या धक्काबुक्कीनंतरही केवळ
हौसेपोटी गणेशभक्त दिवसभर
या रांगेत ताटकळत का होईना दर्शनासाठी आतूर झाला होता. हीच परिस्थिती उर्वरित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात दिसत होती. (प्रतिनिधी)

Web Title: Sari celebrates the ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.