सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांचे निधन
By Admin | Updated: August 7, 2014 15:00 IST2014-08-07T12:40:07+5:302014-08-07T15:00:54+5:30
सारस्वत बँकेचे अध्यक्ष व शिवसेनेचे माजी खासदार एकनाथ ठाकूर यांचे गुरूवारी निधन झाले

सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांचे निधन
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ७ - सारस्वत बँकेचे अध्यक्ष, नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगचे संस्थापक व शिवसेनेचे माजी खासदार एकनाथ ठाकूर (वय ७३) यांचे गुरूवारी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाने आजारी होते. प्रभादेवीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी ११ ते ४ पर्यंत प्रभादेवीतील सारस्वत बँकेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून संध्याकाळी दादर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हापण गावात जन्मलेले एकनाथ ठाकूर यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. दारिद्र्याशी सामना करत एकनाथ ठाकूर यांनी शिक्षणाचे धडे गिरवले. कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेतल्यावर ते स्टेट बँकेत अधिकारी म्हणून लागले आणि बँकिंग क्षेत्रातील त्यांच्या यशस्वी घौडदौडीचा श्रीगणेशा झाला. स्टेट बँकेत नोकरी करत असताना त्यांनी बँकिंग क्षेत्रातील अधिकारी व कर्मचा-यांच्या संघटनेची बांधणी केली. १९७७ मध्ये जिनेव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. भारताच्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सुमारे ३० लाख कर्मचा-यांचे प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली व आंतरराष्ट्रीय पातळीवरही या कोकणपुत्राची दखल घेतली गेली. बँकिंग क्षेत्रात ठसा उमटवणा-या एकनाथ ठाकूर यांच्या कामाची पोचपावती म्हणजे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ठाकूर यांची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालकपदी केलेली नियुक्ती.
२००२ ते २००८ या कालावधीत ते राज्यसभेत शिवसेनेतर्फे खासदार म्हणून निवडून गेले. खासदार म्हणून काम करत असताना ठाकूर यांनी माहिती आणि तंत्रज्ञान, संरक्षण आणि फूड प्रोसेसिंग क्षेत्रासाठी नेमलेल्या संसदीय समितीमध्ये सदस्य म्हणून काम केले. वित्त आणि वाणिज्य क्षेत्रासाठी नेमलेल्या सल्लागार समितीमध्येही त्यांचा समावेश होता.
बँकिंग क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम करत असतानाच एकनाथ ठाकूर यांनी तरुणांना बँकिंग क्षेत्राचे दार खुले करण्यासाठी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सुमारे तीन लाख तरुणांना बँकिंग क्षेत्रात रोजगार मिळवून दिला. या संस्थेचे देशभरात ५० हून अधिक केंद्र आहेत.
बँकिंग क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही एकनाथ ठाकूर यांनी मोलाचे योगदान दिले. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे ते विश्वस्त होते. कराची महाराष्ट्रीयन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. आत्मविश्वास आणि दांडगी इच्छाशक्ती असलेल्या एकनाथ ठाकूर यांना तब्बल ४२ वर्षांपासून कर्करोगाने ग्रासले होते. मात्र कर्करोगासारखा आजार होऊनही ते खचले नाहीत. या रोगावर मात करत त्यांनी वाटचाल सुरुच ठेवली. अगदी कर्करोगाचे उपचार सुरु असतानाही त्यांचे बँकेच्या कामकाजात बारीक लक्ष होते. यासाठी त्यांना कॅन्सर विजेता पुरस्कारही मिळाला होता. देशभरात अनेक बँकां बुडीत निघत असतानाच ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सारस्वत बँकेने यशाचे शिखर गाठले आहे. त्यांच्या निधनामुळे एक दिलखुलास आणि मनमिळावू असा माणूस हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
ठाकूर यांना मिळालेले पुरस्कार
> समाजरत्न पुरस्कार
> डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
> साने गुरुजी पुरस्कार
> कॅन्सर विजेता पुरस्कार
> कॅन्सर सर्व्हायव्हर पुरस्कार
> रोटरी इंटरनॅशनलचा लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार
> एक्सिलन्स इन बिझनेस कम्यूनिकेशन पुरस्कार
> उद्योगरत्न पुरस्कार