Join us
Daily Top 2Weekly Top 5

सांताक्रुझमध्ये बहिणीच्या डोक्यात भावाने घातला तवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 01:58 IST

दारूसाठी पैसे न दिल्याचा राग

मुंबई : दारूसाठी पैसे नाकारल्याच्या रागात मोठ्या बहिणीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सांताक्रुझ परिसरात घडली. बहिणीला रुग्णालयात दाखल करत पोलिसांनी मद्यपी भावाला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सुरेंद्र चव्हाण असे अटक आरोपीचे नाव आहे. तो सांताक्रुझ पूर्वेकडील गोळीबार परिसरात असलेल्या नवरत्न सोसायटीमध्ये राहतो. त्याच्यासोबत त्याची बहीण रूपालीदेखील राहते. चव्हाणला दारूचे व्यसन असल्याने तो पैशासाठी रूपालीसोबत सतत वाद घालत असायचा. रूपाली एका खासगी कुरिअर कंपनीत काम करते़ वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्याने आई आणि भाऊ असलेल्या कुटुंबाची जबाबदारी तिच्यावरच आहे. आई गावी गेल्याने शुक्रवारी ती घरात एकटीच होती. त्यावेळी चव्हाण तिथे आला आणि त्याने रूपालीसोबत वाद घालत पैशांसाठी तगादा लावला. तिने पैसे देण्यास नकार देताच, त्याने रागाने स्वयंपाक घरातील तवा उचलून रूपालीच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. शेजाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षावर फोन करून याची माहिती दिली. त्यानुसार, सांताक्रुझ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, रूपालीला नायर रुग्णालयात दाखल केले व चव्हाणला अटक केली.

टॅग्स :महिलागुन्हेगारी