सानपाडा पूल धोकादायक
By Admin | Updated: August 14, 2014 00:59 IST2014-08-14T00:59:31+5:302014-08-14T00:59:31+5:30
सानपाडा सिलीकॉन टॉवर समोरच्या नाल्यावरील पूल धोकादायक बनला आहे. पावसामुळे येथील माती वाहून गेली आहे.

सानपाडा पूल धोकादायक
नवी मुंबई : सानपाडा सिलीकॉन टॉवर समोरच्या नाल्यावरील पूल धोकादायक बनला आहे. पावसामुळे येथील माती वाहून गेली आहे. पदपथही खचला असून, वेळेत लक्ष दिले नाही तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पामबीच रोडवरून सानपाडा स्टेशनकडे जाण्यासाठी हा रोड बनविला आहे. सिलीकॉन टॉवरसमोर मोठ्या नाल्यावर पूल बांधण्यात आला आहे. नाल्याच्या महामार्गाकडील बाजूला मोठ्याप्रमाणात डेब्रिजचा भराव टाकण्यात आला आहे. गत वर्षभरात हजारो डंपर डेब्रिज येथे टाकले आहे. यामुळे नाल्याच्या आकारावरही परिणाम झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे पुलाच्या एका बाजूला माती वाहून गेली आहे. मोठे भगदाड पडले आहे. पदपथ खचला आहे. पदपथावरून चालणारा प्रवासी थेट नाल्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुलाच्या कोपऱ्यातील माती वाहून जात असल्यामुळे भविष्यात पुलाला धोका निर्माण होवू शकतो. एखादे अवजड वाहन चुकून येथून गेले तर रस्ताही खचण्याची शक्यता आहे. पदपथ खचून अनेक दिवस झाले असून महापालिका प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. सदर पदपथाचा वापर थांबविणे आवश्यक आहे. सदर ठिकाणी सूचना फलक व पत्रे लावण्याची आवश्यकता आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये कोणतीही उपाययोजना केलेली नाही. अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका काय उपाययोजना करणार याविषयी माहिती घेण्यासाठी शहर अभियंता मोहन डगावकर यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. (प्रतिनिधी)