Join us  

ST Strike: “शरद पवारांशी सकारात्मक चर्चा, ST संपावर लवकरच तोडगा निघेल”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 3:08 PM

ST Strike: शरद पवारांनी काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

मुंबई: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे आणि अन्य काही मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Strike) सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हजारो कर्मचारी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, सरकारकडून कोणीही या आंदोलकांशी चर्चा करायला आलेले नाहीत. यावरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर एसटी संपाबाबत लवकरच तोडगा निघेल, असे म्हटले आहे. 

एसटीचा विषय हा तुम्हाला गंभीर वाटत असेल तर तो लवकरच सुटेल. शरद पवारांचीएसटी संपाबाबत काही भूमिका आहे त्याबाबत त्यांनी अनिल परब आणि अजित पवारांसोबत चर्चा केली आहे. एसटी संपाबाबत पवार यांच्या बोलण्यातून असं वाटत आहे की काहीतरी तोडगा लवकरच निघेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. शरद पवारांशी झालेल्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सर्वांना सहानुभूती आहे

राज्यातील वातावरण कोण आणि का भडकवत आहे, या मागील हेतू सर्वांना माहिती आहे. एसटी संपात तेल ओतण्याचे काम कोण करत आहे, हेही आम्हाला माहिती आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सर्वांना सहानुभूती आहे. जे करता येणे शक्य आहे ते सरकार करत आहे. शरद पवारांनी काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत, हे मला समजले, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

त्यांच्याकडे आणि आमच्याकडेही वेळ नाही

शरद पवारांसोबत परमबीर सिंग प्रकरणाची चर्चा करावी तितका तो गंभीर विषय नाही. इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे आणि आमच्याकडेही वेळ नाही आणि त्यानुसार शरद पवारांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 

दरम्यान, ठाकरे सरकारचे वेळकाढूपणा आणि चालढकल करण्याचे धोरण आहे. अनिल परब यांच्या वक्तव्यात काहीच बदल नाही. त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी. हे कर्मचारी त्यांचेच आहेत ना. त्यांनी इथे यावे आणि या कर्मचाऱ्यांशी बोलावे. हे काय कुठले अतिरेकी इथे येऊन बसले आहेत का, त्यांचेच कर्मचारी आहेत. यांचे पालकत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी सरकारच्या वतीने अधिकृतपणे यावे. कर्मचारी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, या शब्दांत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :एसटी संपशरद पवारसंजय राऊत