Join us  

Sanjay Raut: "छत्रपतींच्या घराण्याविषयी आदर, पण निवडणुकांचं गणित वेगळं असतं"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 5:55 PM

आपल्याला सहावा उमेदवार म्हणून लढायचे असेल तर शिवसेनेत येऊन लढा, अशी अट मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांच्यासमोर ठेवली, अशी माहिती आहे.

मुंबई - राज्यसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलेले माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेचा पाठिंबा मागितला. पण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय कळवू, असे ठाकरे यांनी सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर, दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी वेगळंच सत्य सांगितलं आहे. उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचं सूचवल्याचं ते म्हणाले. त्यामुळे, राज्यसभा निवडणुकीतील 6 व्या जागेसाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. 

आपल्याला सहावा उमेदवार म्हणून लढायचे असेल तर शिवसेनेत येऊन लढा, अशी अट मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांच्यासमोर ठेवली, अशी माहिती आहे. संभाजीराजे यांनी आधीच अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर, शरद पवार यांनी राष्ट्रवादीकडील अतिरिक्त मते त्यांना देण्याचे संकेत दिले. मात्र, शरद पवार यांच्या बोलण्याचा संदर्भ वेगळा होता, मीडियाने चुकीचा संदर्भ लावला, मी त्यांना चांगलं ओळखतो, असे संजय राऊत यांनी म्हटले. 

आम्हाला छत्रपती घराण्याविषयी आदर आहे. पण, आम्हाला शिवसेनेचं बळ वाढवायचं असेल तर आम्ही अपक्षांचं नाही वाढवणार. आम्हाला आपल्याबद्दल आदर आहे, आता तुम्ही ठरवायचंय. मी अट हा शब्द वापरत नाही, अट दुसऱ्या माणसांवरती लादली जाते. आपल्या माणसांवरती अट लादली जात नाही. छत्रपतींविषयी, त्यांच्या कुटुंबाविषयी आम्हाला कायम आदर आहे. पण निवडणुकांचं राजकारण वेगळं. आम्हालाही वाटतं की छत्रपतींनी निवडून यावं, निवडून यायलाचं पाहिजे त्यांनी, असे म्हणत संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची भूमिका मांडली.  

भाजपही सध्या वेट अँड वॉच

भाजपचाही संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याबाबत कुठलाच निर्णय अद्याप झालेला नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, एकूणच राज्यसभा निवडणुकीबाबतचा निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी घेतात. यावेळीही तेच निर्णय घेतील.

‘काँग्रेसकडून प्रस्ताव नाही’

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याच्या बातमीत तथ्य नाही. काँग्रेसकडून असा प्रस्ताव आलेला नाही. खोट्या बातम्या पेरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसचा एक गट करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. 

 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनामुंबईसंभाजी राजे छत्रपती