Join us  

आंबोली आणि ओशिवरा पोलीस ठाण्यात बसवले सॅनिटरी वेन्डिंग मशीन्स, आमदार लव्हेकर यांचा सामाजिक उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 9:52 PM

मुंबईतील आंबोली आणि ओशिवरा पोलिस ठाण्यामध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन्स उपलब्ध करून देण्यात आली आहे.मुंबईतील पोलिस ठाण्यात सदर मशीन बसवण्याचा हा पहिला उपक्रम आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई: मुंबईतील आंबोली आणि ओशिवरा पोलिस ठाण्यामध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन्स उपलब्ध करून देण्यात आली आहे.मुंबईतील पोलिस ठाण्यात सदर मशीन बसवण्याचा हा पहिला उपक्रम आहे.तळागाळातील महिलांचे ते ५ दिवस सुसह्य करण्याच्या दृष्टिकोनातून झटणा-या वर्सोवा विधानसभा मतदार संघातील भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी हा उपक्रम वर्सोवा विधानसभा मतदार संघात सुरू केला असून येथील शाळा,महाविद्यालय,सरकारी कार्यालय,आणि अन्य ठिकाणी त्यांनी याआधी सदर मशीन उपलब्ध करून दिली आहेत.

    सर्वसामान्य महिला ह्या सेवेचा लाभ घेत असताना त्याची व्याप्ती महिला पोलिसांकरिता उपलब्ध करून देण्याची गरज मला जाणवली त्यामुळे मी आंबोली आणि ओशिवरा ह्या दोन्ही पोलीस स्टेशन्स मध्ये सुरु करण्याचा संकल्प केला आज त्यास मूर्त स्वरूप आल्याचे समाधान मिळाले'' अशी प्रतिक्रिया डॉ. लव्हेकर यांनी व्यक्त केली. महिलांच्या त्या ५ दिवसांच्या वेदना अधिक सुसह्य करून त्यांना सॅनिटरी पॅड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. लव्हेकर यांची सामाजिक संस्था ' ती फाऊंडेशन'  २००९ पासून कार्यरत आहे. त्यांच्या डॉटर्स ऑफ वर्सोवा' या मोहिमेअंतर्गत सॅनिटरी पॅड्सचे मोफत वाटप, मोफत सॅनिटरी पॅड एटीएम आणि डिस्पोझल मशिन्स, मॅनस्ट्रुअल हेल्थ किट सॅनिटरी पॅड बँकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

यावेळी आंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड, ओशिवरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वार्ड क्रमांक ६० चे नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर आणि वॉर्ड क्रमांक ६३ च्या नगरसेविका  रंजना पाटील उपस्थित होते.

ही सुविधा महिला पोलिसांबरोबरच येथे येणा-या सर्वसामान्य महिला तक्रारदारांसाठीही असणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला पोलिस तसेच आंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड, ओशिवरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी डॉ. लव्हेकर यांचे आभार मानले.

एका सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून त्यांनी वर्सोवा विधानसभा मतदार संघात राबवलेल्या डॉटर्स ऑफ वर्सोवा या उपक्रमाची सुरवात येथील यारी रोडच्या चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल आणि क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्स मधून सुरू केली होती.तर गरजू महिलांसाठी देशात पहिली सॅनिटरी नॅफकीन पॅड बँक त्यांनी देशात सुरू केली आहे.या बँकेचे उदघाटन अमृता देवेंद्र फडणवीस आणि अभिनेत्री झिनतमान आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले होते.

ही सुविधा महिला पोलिसांबरोबरच येथे येणा-या सर्वसामान्य महिला तक्रारदारांसाठीही असणार आहे.आंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड, ओशिवरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी आमदार डॉ. लव्हेकर यांनी येथे राबवलेल्या या सामाजिक उपक्रमांबद्दल आभार मानले आहेत.

टॅग्स :मुंबईपोलिस