Join us  

सांगलीचा दुष्काळ ते लालबागची चाळ अन् तिथून थेट राष्ट्रीय पुरस्कार... दिग्दर्शक भीमराव मुडेंचं पहिलं 'स्वप्न' साकार

By महेश गलांडे | Published: April 13, 2021 6:40 PM

मूळ सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील मुडेवाडी गावचं मुडे कुटुंब. पण, दुष्काळानंतर जगण्यासाठी मुंबईत आलं. तेव्हा स्थलांतरितांना मुंबईच्या गिरण्यांचाच मोठा आधार. पण, 1982 ला गिरणी कामगारांनी पुकारलेल्या संपात हजारो कुटुंबीयांची नोकरी अन् भाकरी गेली.

ठळक मुद्देगिरणगावच्या चाळीत एका छोट्याशा खोलीतून सुरु झालेला प्रवास. शाळेत असतानाच भाजी विकणे, पेपर टाकणे ही काम करावी लागली. वडिलांची मिल बंद पडल्यानं आईने सुरू केलेल्या खाणावळीच्या कामाचाही भार बालखांद्यावर पडला.'बार्डो'ला यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळे, एकप्रकारे भीमराव मुडेंच्या 'थेअरी ऑफ ड्रीम रिलेटीव्हीटी'लाही राष्ट्रमान्यता मिळाली, असेच म्हणावे लागेल. 

महेश गलांडे

मुंबई - जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला अन् जगाने तो मान्य केला. 'थिअरी ऑफ रेलेटीव्हीटी'च्या या सिद्धांतावरुनच 'थिअरी ऑफ ड्रीम रिलेटीव्हीटी'चा सिद्धांत मुंबईच्या गिरणवातील भीमराव मुडे या तरुण दिग्दर्शकाने 'बार्डो' चित्रपटातून मांडला आहे. 'बार्डो'ला यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळे, एकप्रकारे भीमराव मुडेंच्या 'थेअरी ऑफ ड्रीम रिलेटीव्हीटी'लाही राष्ट्रमान्यता मिळाली, असेच म्हणावे लागेल. 

मूळ सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील मुडेवाडी गावचं मुडे कुटुंब. दुष्काळानंतर जगण्यासाठी मुंबईत आलं. तेव्हा स्थलांतरितांना मुंबईच्या गिरण्यांचाच मोठा आधार. पण, 1982 ला गिरणी कामगारांनी पुकारलेल्या संपात हजारो कुटुंबीयांची नोकरी अन् भाकरी गेली. महेश मांजरेकर यांच्या लालबाग परळ चित्रपटातून गिरणीकामगारांची ही व्यथा आपण पाहिलीच. या संपाचा फटका लालबागमधील मुडे कुटुंबीयांनाही बसला. मुलं शाळेत शिकत असतानाच रोजगार बंद झाला. आल्या परिस्थितीला तोंड देत, लेकरांच्या मदतीनं मुडे कुटुंबीयांचा प्रवास सुरू झाला. लालबागच्या चाळीतील या गिरणी कामगाराचा मुलगा म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेता दिग्दर्शक भीमराव मुडे. 'लोकमत डॉट कॉम'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा प्रवास उलगडला.  

गिरणगावच्या चाळीत एका छोट्याशा खोलीतून सुरु झालेला प्रवास. शाळेत असतानाच भाजी विकणे, पेपर टाकणे ही काम करावी लागली. वडिलांची मिल बंद पडल्यानं आईने सुरू केलेल्या खाणावळीच्या कामाचाही भार बालखांद्यावर पडला. मात्र, परिस्थितीच्या छताडावर उभं ठाकून भीमराव यांनी स्वत:ला सिद्ध केलंय. त्यात, मोठ्या भावाची मोलाची साथ मिळाली, भावानेच आपल्या स्वप्नांचा बळी देत स्वप्नांची थेअरी मांडणाऱ्या भीमराव मुडेंच्या आयुष्याला 'खो' दिला.

भीमराव यांनी गिरणगावच्या शाळेतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर, महर्षी दयानंद महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं. याच काळात नाटक अन् एकांकिकेच्या माध्यमातून सिनेक्षेत्राचं आकर्षण वाढलं. बीए.बीएड करायचं अन् शिक्षकाची नोकरी मिळवायची हेच काय ते ध्येय. मात्र, एकांकिका अन् नाटकांतून त्यांच्या आयुष्याचं गणितच बदललं. अभिनयात गोडी निर्माण झाल्याने थेअटर करायचं ठरलं. संतोष कानेकर या बालमित्राने त्यांच्यातला दिग्दर्शक बाहेर काढला. आता, तू एकांकिका बसायवला हवी म्हणून संतोषने दिग्दर्शकाची ट्यूब डोक्यात पेटवली अन् त्या पेटलेल्या ट्युबने चित्रपटसृष्टीला एक तळपणारा दिग्दर्शक भीमराव मुंडे दिला. पदवीनंतर वकिलीचं शिक्षणही पूर्ण केलं. पण यत्र, तत्र अन् सर्वत्र सिनेसृष्टीच दिसत असल्यानं आयुष्यभर चित्रपटसृष्टीचीच वकिली करण्याचा निर्णय घेतल्याचं भीमराव यांनी सांगितलं. 

सन 2003 पासून भीमराव यांच्या दिग्दर्शन क्षेत्रातील कामाचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला. कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रीक या मालिकेत सहायक दिग्दर्शकांची जबाबदारी त्यांना मिळाली अन् त्यांनी करून दाखवलं. त्यानंतर, द हिंद वॉटर नावाची शॉर्टफिल्म त्यांनी दिग्दर्शित केली. त्या, शॉर्टफिल्मला अनेक पुरस्कार मिळाले, समीक्षकांनीही त्याचं कौतुक केलं. त्यामुळे, भीमराव यांचा विश्वास बळावला अन् आत्मविश्वास वाढला. दरम्यानच्या काळात अनेक मालिकांच्या दिग्दर्शकाचही जबाबदारी या तरुणावर पडली अन् त्यातूनही त्याने महाराष्ट्राला बेस्टच दिलं. बापमाणूस, रुद्रम यांसारख्या मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले. तर, नुकतेच महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या आई माझी काळूबाई या मालिकेच्या पडद्यामागेही त्यांची दिशा आहे. दरम्यानच्या, काळात सिने क्षेत्रातील बिझनेस जवळून अनुभवता आला, हा बिझनेस शिकण्यासाठीच तीन वर्षांचा कालावधी गेल्याचं ते आवर्जून सांगतात. सन 2009 मध्ये भीमराव यांनी डावपेच हा चित्रपट केला, जो 2010 ला रिलीज झाला. या चित्रपटाचंही कौतुक झालं. त्यानंतर, 2016 मध्ये कौल मनाचा हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. चित्रपट आणि मालिकांचे 'डावपेच सोडवताना 'मनाचा कौल' घेत स्वप्नांतला सिनेमा बनविण्याचं ध्येय पूर्णत्वाला नेलं. त्याचं स्वत:च अन् त्यांच्यावर विश्वास दाखवणाऱ्या अनेकांचं स्वप्न पूर्ण करणारा 'बार्डो' त्यांनी 70 मिमिच्या पडद्यावर आणला. 

काय आहे 'बार्डो'

'बार्डो' चित्रपटाच्या नावावरुनच अनेकांपुढे प्रश्नचिन्ह उभारेल. कारण, बार्डो शब्द, ना हिंदी ना मराठी. हा तिबेटीयन शब्द आहे, त्यामुळे चित्रपटाच्या नावापासूनच आम्ही प्रत्येक बाबींची काळजी घेतली. यापूर्वीच्या अनुभवातून खूप शिकायला मिळाल्याचं भीमराव सांगतात. मृत्यूनंतर ममीज बनतात, त्या मृत शरीराला कालांतराने पुनर्जन्म मिळतो, मृतावस्था आणि पुनर्जन्म यांच्यातील अवस्था म्हणजे 'बार्डो', असल्याचं भीमराव म्हणतात. बार्डो नेमकं काय आहे, हे समजून घेण्यासाठी चित्रपटच पहायला हवा, असेही त्यांनी सांगितलं. बार्डोमध्ये गाव आहे, गावातील माणसं आहे, विहिरीत पोहोणारी लहान पोरं आहेत, ग्रामीण धाटणीचं जगणं आहे, पण सिनेमाची कथा अतिशय वेगळी अन् तितकीच 'दमदार' आहे. त्यामुळे, तो 70 मिमिच्या पडद्यावरच पाहा...

20 वर्षांचा संघर्ष, पहिलं स्वप्न पूर्ण

'बार्डो'ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अभिनंदनाचा वर्षाव होतोय, गिरणगावात आपल्या भीमाचं कौतुक होतंय. अनेक दिग्गजांचे फोन येतायंत, कित्येक प्रोजेक्टही हाती आलेत. मात्र, या यशाच्या कहाणीमागे गेल्या 20 वर्षांचा संघर्ष आहे, आपल्या माणसांची साथ-सोबत आहे, परिस्थितीने दिलेल्या चटक्यांचाही मोठा हात आहे. आई-वडिलांसह हजारो आप्तेष्टांची स्वप्न आहेत, जी राष्ट्रीय पुरस्काराने पूर्णत्वास आली. मात्र, आता निश्चित जबाबदारी वाढलीय. कारण, आता महाराष्ट्राची, कोट्यवधी सिनेरसिकांच्या अपेक्षांची स्वप्ने पूर्ण करायची आहेत. त्यामुळे, पु्न्हा एकदा नव्या स्वप्नांचा पाठलाय करायचाय. कारण, 'थेअर ऑफ ड्रीम रिलेटीव्हीटी' आता सिद्ध झालीय, असं सांगताना भीमराव मुडेंच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद जाणवतो.

 

टॅग्स :सांगलीसिनेमामराठीराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018