सांगलीत झेंडू कोसळला; मुंबईने सावरले

By Admin | Updated: October 2, 2014 23:49 IST2014-10-02T23:39:58+5:302014-10-02T23:49:12+5:30

आवक वाढली : ५० ते ६० रुपये दर; उत्पादक झाले हवालदिल

Sangli marine collapses; Mumbai revived | सांगलीत झेंडू कोसळला; मुंबईने सावरले

सांगलीत झेंडू कोसळला; मुंबईने सावरले

सांगली : आवक वाढल्याने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सांगलीत झेंडूचा दर कोसळला. मात्र मुंबईत आज ५० ते ६० रुपये दर मिळाल्याने उत्पादक खूश झाले आहेत. येथील बाजारपेठेत मात्र दसरा आणि खंडेनवमीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातूनही झेंडू फुलांची आवक झाली आहे.
येथील दत्त-मारुती रस्ता, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय परिसर, रिसाला रोड, कापड पेठ, गणपती पेठ, विश्रामबाग चौक आदी परिसरात आष्टा, तुंग, वाळवा, जत परिसरासह सोलापूर जिल्ह्यातून झेंडू उत्पादक व विक्रेत्यांनी झेंडू फुलांच्या विक्रीसाठी ढिगारे लावले आहेत. सांगलीत आज (गुरुवार) सायंकाळी झेंडू फुलांचा दर ४० ते ५० रुपये किलो होता.
आज सकाळी झेंडूचा दर ८० रुपये किलो होता. त्यानंतर सायंकाळी दर उतरत गेला. रात्रीही फुलांची आवक सुरुच होती. यामुळे यावर्षी झेंडू फुलांची आवक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे झेंडूचा दर कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती राजू कुंभार यांनी दिली.
सांगलीत आज झेंडू फुलांचा दर कोसळला असला तरी मुंबईमध्ये आज झेंडूला ६० रुपयाहून अधिक दर मिळाला. नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला अगदी २० ते ३० रुपयापर्यंत फुलांचा दर कोसळला होता. त्यानंतर दर वाढत गेला. आज ६० रुपये दर मिळाल्याची माहिती आष्टा येथील झेंडू उत्पादक संभाजी चव्हाण यांनी दिली. गणेशोत्सवात झेंडूला दर चांगला मिळाला होता. यावेळी फुलांचे दर ७० रुपये किलोपर्यंत गेले होते. त्यानंतर मात्र दरात घसरण होत गेली. मुंबईत मिळालेल्या दरामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)


उत्पादन खर्चाचे वांदे
मुंबईत झेंडूला आज चांगला दर मिळाला. गणेशोत्सवानंतर झेंडूचे दर कोसळत चालले होते. आज दर ६० रुपये मिळाला. यामुळे उत्पादन खर्च भागणार आहे. नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला ३० ते ४० रुपयापर्यंत दर कोसळले होते. आजच्या दरामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे, असे तुंग येथील झेंडू उत्पादक प्रमोद भानुसे यांनी सांगितले.

Web Title: Sangli marine collapses; Mumbai revived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.