समुद्रकिनारी पर्यटकांची मांदियाळी
By Admin | Updated: November 2, 2014 23:29 IST2014-11-02T21:24:18+5:302014-11-02T23:29:42+5:30
शिरोडा वेळागरमधील स्थिती : पर्यटक लुटताहेत वॉटर स्पोर्टसचा थरार

समुद्रकिनारी पर्यटकांची मांदियाळी
शिरोडा : वेंगुर्ले तालुक्यातील वेळागर समुद्र किनाऱ्याला जिल्हासह विदेशी पर्यटकही पसंती देत आहेत. याठिकाणी येणारे पर्यटक सद्यस्थितीत वॉटर स्पोर्टस्ची मजा लुटत आहेत. यासाठी खिशाला चाट पडत असला तरीही पर्यटक वॉटर स्पोर्टस्चे थ्रील अनुभवण्यासाठी पैशाची पर्वा करताना दिसत नाहीत. वॉटर स्पोर्टसच्या उपलब्धतेमुळे येथील पर्यटकांना वेगळा आनंद अनुभवता येत आहे.
वेंगुर्ले तालुक्यात स्वच्छ समुद्र किनारे असल्याने तसेच गोव्यात आलेल्या विदेशी पर्यटकांना वेंगुर्ल्यात येणे सहजरित्या शक्य असल्याने जास्त विदेशी पर्यटक गोव्यातील पर्यटनानंतर वेंगुर्ले येथील शांत व स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांवर येत आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. शिरोडा वेळागर समुद्रकिनारी पर्यटकांसाठी घोडा व उंट यांच्या सवारीची सोयही करण्यात आली आहे. याचा लाभ पर्यटक घेत असताना आता पर्यटकांचा जास्त ओघ हा वॉटर स्पोर्टस्चा आनंद घेण्यावर दिसून येत आहे. येथे वॉटर स्पोर्टस्तर्फे बोटींग, जेट स्की, बनाना बोट, समुद्रकिनारी करण्यात येणारी मोटारसायकलींगचा आनंद लुटताना दिसत आहेत. पाण्यात बोटींग करताना मोठ्या लाटांवर स्वार होतानाची भीती आणि त्यासोबतच होणारा आनंद पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. पाण्याच्या भीतीने पाण्यात जाण्यास घाबरणारे पर्यटकही यानिमित्ताने मजा लुटत आहेत.
समुद्रकिनाऱ्यावर उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या या सुविधांकरिता दोनशे ते तीनशे रुपये प्रत्येकी एका खेळासाठी पर्यटक देत आहेत. विदेशी पर्यटकही या खेळांचा आनंद लुटताना दिसत आहेत. वॉटर स्पोर्टस्च्या गोव्यातील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा आहेत. मात्र, सिंधुदुर्गातही अशाप्रकारच्या सुविधा सगळ्याच समुद्रकिनाऱ्यांवर उपलब्ध करुन दिल्यास व स्थानिकांना याचे योग्य प्रशिक्षण दिले गेल्यास जिल्हातही पर्यटनातून आर्थिक संपन्नता येण्यास वेळ लागणार नाही. पर्यटकांना सुविधा उपलब्ध करुन दिल्यास याठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो अशी विधाने नेहमीच केली जातात. मात्र, नेमके काय करावे याचे मार्गदर्शन तरुणांना कोणीच करत नसल्याचे सध्यातरी पहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)
शिरोडा वेळागर समुद्रकिनारी पर्यटक वॉटर स्पोर्टस्चा आनंद लुटताना दिसत आहेत.