सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानक : रेल्वे रूळ ओलांडणे हाच पर्याय! हँकॉक पूल तोडल्यामुळे स्थानिकांसह प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 05:37 IST2017-10-19T05:37:15+5:302017-10-19T05:37:52+5:30
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर तिन्ही मार्गांवरील रेल्वे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत रूळ ओलांडताना प्रवाशांचे अपघात होणे किंवा त्यांचा जीव जाणे हा जणू दिनक्रमच झाला आहे.

सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानक : रेल्वे रूळ ओलांडणे हाच पर्याय! हँकॉक पूल तोडल्यामुळे स्थानिकांसह प्रवाशांचे हाल
- स्नेहा मोरे
मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर तिन्ही मार्गांवरील रेल्वे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत रूळ ओलांडताना प्रवाशांचे अपघात होणे किंवा त्यांचा जीव जाणे हा जणू दिनक्रमच झाला आहे. परंतु, तरीही रेल्वे प्रशासन या प्रकरणी कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. हँकॉक पूल तोडल्यानंतर सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाच्या ठिकाणीही रेल्वे प्रवासी आणि स्थानिक रेल्वे रूळ ओलांडूनच प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत.
वाडीबंदर येथील हँकॉक पूल तोडल्यानंतर परिसरातील स्थानिक आणि रोजच्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. या ठिकाणाहून ये-जा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, या मागणीसाठी रेल रोको, विविध आंदोलने करूनही प्रवासी आणि स्थानिकांच्या पदरी निराशा आली आहे. सॅण्डहर्स्ट रोड हे आशिया खंडातील एकमेव डबलडेकर रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणी हार्बर रेल्वेचे दोन फलाट आहेत. मात्र या ठिकाणी ये-जा करण्यासाठी रेल्वेचा केवळ एकच पादचारी पूल आहे. त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गांवरील प्रवाशांची गर्दी याच पुलावर होते; शिवाय हा पूलही अरुंद आहे. वाडी बंदर, मशीद बंदर, चिंच बंदर, डोंगरी, सॅण्डहर्स्ट रोड, माझगाव डॉक या परिसरात बराच मोठा कामगार वर्ग कार्यरत आहे. त्यांच्याकरिता ये- जा करण्यासाठी हँकॉक पूल हा एकमेव पर्याय होता. तोदेखील उपलब्ध नसल्याने आता स्थानिक आणि पादचारी चार रेल्वे रूळ ओलांडून स्थानक गाठतात. रूळ ओलांडणाºयांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. रेल्वे रूळ ओलांडताना अनेकांचा जीवही गेला आहे, त्यात दुर्दैवाने लहानग्यांचाही समावेश होता.
वाडी बंदर येथील चिंचोळ्या गल्लीतून निसरड्या वाटेवरून स्थानिक आणि प्रवासी रेल्वेरुळापर्यंत पोहोचतात. त्या ठिकाणी जर यार्डातून एखादे इंजिन वा एक्स्प्रेस जात असेल तर तेथेच २०-२५ मिनिटांचा खोळंबा होतो. काही प्रवासी तर धिम्या गतीत असलेल्या एक्स्प्रेसमध्ये चढून थेट दुसºया दरवाजाने खाली उतरत रूळ ओलांडतात. एकंदरित, हा रूळ ओलांडण्याचा मृत्यूच्या दाढेतील प्रवास प्रत्येकासाठीच नकोसा आहे. परंतु रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ, दुर्लक्षित व्यवस्थेमुळे ही ‘मरणवाट’ निवडावी लागतेय, असे स्थानिक आणि प्रवाशांचे म्हणणे आहे.
मरणवाट
मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाºया आणि तब्बल १३६ पावसाळे नेटाने झेलून उभा राहिलेला, संयुक्त महाराष्ट्राचा लढा जवळून अनुभवणारा, निवडणूक,
मोर्चे आणि अनेक दिंड्यांचा साक्षीदार असलेला हँकॉक पूल इतिहासजमा झाला. पुलाखालून होणाºया लोकलच्या वाहतुकीमुळे कित्येक वर्षे या पुलाची धडधड निरंतर सुरूच होती. दिवसेंदिवस प्रवाशांची वाढती संख्या आणि काळानुरूप मुंबई लोकलच्या वाहतूक व्यवस्थेत झालेले बदल यामुळे २००९ साली हा पूल रेल्वेच्या वेगात अडथळा ठरत असल्याचे निष्पन्न झाले आणि
अखेर २०१६ साली या पुलावर हातोडा पडला; आणि पुलासोबत या ठिकाणी राहणाºया रहिवाशांच्याही अनेक आठवणी या पुलासोबत विसर्जित झाल्या. १८७९ साली रेल्वे फाटकावरून रहदारी सुरळीत व्हावी याकरिता हँकॉक पुलाचे निर्माण करण्यात आले होते. आता हा
पूलच राहिला नसून पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवासी जिवावर उदार
होऊन रेल्वे रूळ ओलांडत आहेत. रोजच ‘मरणवाट’ तुडवावी लागत असल्याची प्रवाशांची खंत आहे.
पर्यायी व्यवस्था उभारण्यास प्रयत्नशील
हँकॉक पूल तोडल्यानंतर त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्थेविषयी आम्हीसुद्धा प्रयत्नशील आहोत. ज्या पद्धतीने आता या परिसरातील प्रवासी, स्थानिक प्रवास करतात, तो अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, शिवाय या ठिकाणी त्वरित पूल वा रस्त्याची सेवा देण्यासाठी पालिका आणि रेल्वे प्रशासनाशी बोलणे करणार आहोत, जेणेकरून हँकॉक पुलाच्या ठिकाणी नवीन पूल होईस्तोवर पादचाºयांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.
- अरविंद सावंत, खासदार
प्रतिसाद नाही : रोजच रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, यासाठी या रेल्वे रुळांवर बसून रेल रोको करण्यात आला होता. त्यातही मी सहभाग घेतला होता, पण आमच्या हाती काहीच आले नाही, प्रशासनाचा प्रतिसाद देत नाही. - जसू सोनिया, प्रवासी
पर्यायी व्यवस्था उभारणार
स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून बºयाचदा या समस्येविषयी रेल्वे आणि पालिकेशी चर्चा केली आहे. आता स्थानिकांच्या मदतीने आम्ही कृतिशील पावले उचलून पर्यायी व्यवस्था उभारण्याचे प्रयत्न करणार आहोत.
- निकिता निकम, स्थानिक नगरसेविका
सूचना, तक्रारी, व्हिडीओ : ‘लोकमत’च्या वाचकांच्या ‘मुंबईचा ºहास आता बास’ या मालिकेसंदर्भात काही सूचना, प्रतिक्रिया असल्यास ८८४७७४१३०१ या क्रमांकावर कळवाव्या. लोकल स्थानकांच्या तक्रारीही या क्रमांकावर पाठवता येतील. स्थानकांतील समस्यांचे व्हिडीओदेखील वाचक या क्रमांकावर पाठवू शकतात.
ंप्रशासनाला जाग येणार कधी?
गेली अनेक वर्षे वाडीबंदर परिसरात राहतोय, त्यामुळे हँकॉक पुलाचा मार्ग नित्याचाच. रूळ ओलांडताना समोरून लोकल येण्याची भीती सतत असते. अनेक लहानग्यांचे हकनाक बळी या रेल्वे रुळांनी घेतले आहेत. प्रशासनाला जाग येणार तरी कधी?
- यशवंत पाटील, प्रवासी
दुर्घटनेतून धडा घ्यावा : रेल्वे रूळ ओलांडण्याचा मार्ग पत्करावाच लागतो. बºयाचदा डोळ्यांसमोर अपघात होतात, पण काहीच करू शकत नाही. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने धडा घेतला पाहिजे. - तरुण बोरीचा, प्रवासी
शॉर्टकट... चुकीचा शॉर्टकट जीवघेणा ठरतोच. परंतु सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात या शॉर्टकटचा मोठ्या प्रमाणात वापर करून रूळ ओलांडण्यात येत आहेत. मात्र, या मरणवाटेवरून चालण्याखेरीज दुसरा पर्यायच उपलब्ध नाही, अशी खंत प्रवाशांनी व्यक्त केली.