Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sambhajiraje: 'बूँद से गई ओ, हौद से नही आएगी', चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 12:42 IST

संभाजीराजेंच्या या विधानानंतर आता भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात येत आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) दिलेला शब्द मोडला. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी शिवसेनेत प्रवेश करावा अशी ऑफर मला दिली. परंतु मी त्यास नकार दिला. शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडी उमेदवार म्हणून मला पाठिंबा द्यावा अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली. सगळं काही ठरलं. त्यांनी खासदार, मंत्र्यांशी चर्चा केली. पण कोल्हापूरला जाताना वेगळ्याच बातम्या समोर आल्या असा खुलासा छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. संभाजीराजेंच्या या विधानानंतर आता भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात येत आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर ३७ मधील ३५०० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. राज्य शासनाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सारथी या संस्थेची स्थापना केलेली आहे. या संस्थेला अनुदान आणि विद्यार्थ्यांना सवलती व वसतिगृह मिळावे, यासाठी संभाजीराजेंनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे, चित्रा वाघ यांनी सारथीसाठी देण्यात आलेल्या जागेचा संदर्भ राज्यसभा खासदारकीला पाठिंबा नाकारण्याशी जोडला आहे. त्यावरुन, वाघ यांनी सारथीच्या भूखंडाची बातमी शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला. 

संभाजीराजेंच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या 'सारथी'ला नवी मुंबईत भूखंड देण्याचा प्रस्ताव ठाकरे सरकारने कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला आहे. ठाकरे सरकारचे हे लबाडा घरचे अवताण आहे. बूँद से गई सो हौद से नहीं आएगी।, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. आपल्या ट्विटमधून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधल्याचे दिसून येते. 

ही माघार नाही, स्वाभीमान आहे

छत्रपती संभाजीराजे(Yuvraj Chhatrapati Sambhajiraje) म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश करा तुम्हाला खासदार करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. परंतु मी प्रवेश करणार नाही स्पष्ट सांगितले. माझी उमेदवारी ही घोडेबाजारासाठी नव्हती. सगळ्या पक्षातील लोकांनी मला मदत करावी. निष्कलंक माझं व्यक्तिमत्व आहे. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतोय. ही माघार नाही तर माझा स्वाभिमान आहे असं त्यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीचित्रा वाघमहाविकास आघाडी