Join us  

संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; राज्यसभेसाठी मागितला शिवसेनेचा पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 5:39 AM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय कळवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलेले संभाजीराजे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेचा पाठिंबा मागितला. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय कळवू, असे ठाकरे यांनी सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आपल्याला सहावा उमेदवार म्हणून लढायचे असेल तर शिवसेनेत येऊन लढा, अशी अट मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांच्यासमोर ठेवली, अशी माहिती आहे. संभाजीराजे यांनी आधीच अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीकडील अतिरिक्त मते त्यांना देण्याचे संकेत दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्याप तसा निर्णय झालेला नाही. आमच्याकडील अतिरिक्त मते शिवसेनेला दिली जातील, असे सूचित केले. पवार यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने राज्यसभेच्या दोन जागा जिंकल्या तेव्हा सेनेने अतिरिक्त मते आम्हाला दिलेली होती. त्यामुळे पुढील वेळी आम्ही त्यांना अतिरिक्त मते देण्याचा ‘शब्द’ दिला होता.

भाजपचाही संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याबाबत कुठलाच निर्णय अद्याप झालेला नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, एकूणच राज्यसभा निवडणुकीबाबतचा निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी घेतात. यावेळीही तेच निर्णय घेतील.

‘काँग्रेसकडून प्रस्ताव नाही’

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याच्या बातमीत तथ्य नाही. काँग्रेसकडून असा प्रस्ताव आलेला नाही. खोट्या बातम्या पेरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसचा एक गट करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीउद्धव ठाकरेमहाविकास आघाडीराज्यसभा