Join us  

संभाजी भिडेंचा नवा दावा, 'मनू हा जगातला पहिला कायदेपंडित'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 11:09 AM

'मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलयं, असा दावा भिडेंनी केला.

मुंबई - भीमा-कोरेगाव दंगल आणि आंब्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चर्चेत असलेल्या शिव-प्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंनी आणखी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. 'मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलयं, असा दावा भिडेंनी केला. तसेच मनुस्मृतीचा अभ्यास करुनच मी देशाची राज्यघटना लिहिली आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याचा दावाही भिडेंनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावरुन त्यांना टार्गेट करण्यात येत आहे.

मनु हा संतापेक्षा श्रेष्ठ असल्याचे भिडे यांनी म्हटले होते. मात्र, मी ज्ञानोबा आणि तुकोबांची मनुबरोबर तुलना केली नसल्याचे भिडेंनी स्पष्ट केले आहे. तर, मनुस्मृतीचा आधार घेऊनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिल्याचा, दावा भिडे यांनी केला आहे. तसेच राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनुचा पुतळा उभारण्यात आला. त्याप्रसंगी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर होते. त्यावेळी, मनुच्या उभारण्यात आलेल्या पुतळ्याखाली, 'मनु हा जगातील पहिला कायदेपंडित होता,' असे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिल्याचा दावाही भिडे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

दरम्यान, या मुलाखतीत बोलताना, भिडेंनी भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटेंना क्लीनचीटी दिली. तसेच भीमा-कोरेगाव दंगल पेटविण्याचे काम संभाजी ब्रिगेडने केले आहे. संभाजी ब्रिगेड म्हणजे अतृप्त आत्मे असल्याची टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :संभाजी भिडे गुरुजीसंभाजी ब्रिगेडभीमा-कोरेगाव