Join us

सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 6:06 AM

तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी वकिलांनी खंडपीठाकडे केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीच्या कथित कोठडी आत्महत्येबाबत सुरू असलेल्या चौकशीचा सद्यस्थिती अहवाल सादर करण्यास उच्च न्यायालयाने सांगितले आहे. न्या. संदीप मारणे व न्या. नीला गोखले यांच्या सुटीकालीन खंडपीठाने संबंधित पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज व पोलिसांचा कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) जतन करून ठेवावा, असे निर्देशही यावेळी न्यायालयाने दिले. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी २२ मे रोजी ठेवली आहे. 

मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या लॉकअपमधील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अनुज थापनची आई रिता देवी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होती. अनुज थापनने आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या आईने याचिकेद्वारे केला आहे. मुलाच्या मृत्यूची चौकशी करण्याचे निर्देश सीबीआयला द्यावेत, अशी मागणी रिता देवी यांनी केली आहे. अनुजला पोलिस कोठडीत मारहाण करण्यात आली व त्याला छळण्यातही आले, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे. सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले की, याप्रकरणात अपघाती मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. 

‘तपास सीबीआयकडे वर्ग करा’

अनुजचा कोठडीत मृत्यू होऊन १४ दिवस उलटले आहेत. त्यामुळे तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी रिता देवी यांच्या वकिलांनी खंडपीठाकडे केली. आंधळेपणाने तपास सीबीआयकडे वर्ग करू शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने दंडाधिकारी व सीआयडीचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारला दिले. सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी अनुज थापन याला २६ एप्रिल रोजी पंजाब येथून अटक केली होती. आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यापैकी चार जण न्यायालयीन कोठडीत आहेत, तर दोन जण पोलिस कोठडीत आहेत. 

टॅग्स :मुंबई हायकोर्टसलमान खान