सलमानला दया नको
By Admin | Updated: December 4, 2015 08:40 IST2015-12-04T01:55:35+5:302015-12-04T08:40:19+5:30
हिट अॅण्ड रन केसप्रकरणी बॉलीवूड अभिनेता सलमान खानने केलेल्या अपिलावर गुरुवारी सरकारी वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला. सलमान खानला दया दाखवू नये. त्याला सत्र

सलमानला दया नको
- हायकोर्टाकडे मागणी : सरकारी वकिलांचा युक्तिवाद संपला
मुंबई : हिट अॅण्ड रन केसप्रकरणी बॉलीवूड अभिनेता सलमान खानने केलेल्या अपिलावर गुरुवारी सरकारी वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला. सलमान खानला दया दाखवू नये. त्याला सत्र न्यायालयाने ठोठावलेली ५ वर्षांची शिक्षा योग्य ठरवावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाकडे केली.
एकाच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या व ४ जणांना जखमी केलेल्या सलमानला मे महिन्यात सत्र न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कायम करावी, अशी मागणी सरकारी वकील संदीप शिंदे यांनी न्या. ए.आर. जोशी यांना केली. सत्र न्यायालयाने सलमानला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली ५ वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावली. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सलमान उच्च न्यायालयात अपिलात गेला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, दुर्घटनेवेळी आरोपीने (सलमान) मद्य घेतले होते.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्याला रुग्णालयात चाचणीसाठी नेले असता त्याच्या श्वासाला मद्याचा वास येत होता. सलमानच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी तो घटनेच्या वेळी गाडी चालवत नव्हता, त्याचा ड्रायव्हर अशोक सिंहच गाडी चालवत होता. तसेच त्याने त्या दिवशी मद्यपान केले नव्हते, असे न्या. जोशी यांना सांगितले. (प्रतिनिधी)
सरकारतर्फे युक्तिवाद
सरकारी वकिलांनी गाडीत केवळ तीनच व्यक्ती असल्याचे खंडपीठाला सांगितले. ‘त्या दिवशी सलमानच्या गाडीत केवळ तीनच व्यक्ती होत्या. सलमान खान, त्याचा पोलीस बॉडीगार्ड रवींद्र पाटील आणि त्याचा मित्र कमाल खान. अशोक सिंह त्या वेळी गाडीत बसलेला नव्हता,’ असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.