Join us

महामुंबईत एक लाख ६३ हजार कोटींच्या घरांची विक्री; ७ शहरांत साडेचार लाख कोटी रुपयांची होणार उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 05:57 IST

चालू वर्षात मुंबईसह महामुंबई परिसरात घरांच्या विक्रीने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून तब्बल एक लाख ६३ हजार कोटी रुपयांची उलाढाल करत विक्रम रचला आहे.

मुंबई : चालू वर्षात मुंबईसह महामुंबई परिसरात घरांच्या विक्रीने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून तब्बल एक लाख ६३ हजार कोटी रुपयांची उलाढाल करत विक्रम रचला आहे. तर याच वर्षअखेरपर्यंत देशातील सात प्रमुख शहरांत घरांची विक्री साडेचार लाख कोटी रुपयांची उलाढाल करेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

२०२२ मध्ये मुंबईसह देशातील सात प्रमुख शहरांत तीन लाख २६ हजार ८७७ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ३८ टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. २०२२ या संपूर्ण वर्षात झालेली उलाढाल चालू वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांतच झाल्याचेही दिसून आले आहे. बांधकाम क्षेत्रातील एका अग्रगण्य कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईसह महामुंबई परिसरात गेल्यावर्षी एक लाख १६ हजार २४२ कोटी रुपये मूल्याची घरे विकली गेली होती. त्यामध्ये तब्बल ४१ टक्के वाढ झाली असून आतापर्यंत एक लाख ६३ हजार कोटी रुपये मूल्याच्या घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, यंदा मुंबई शहरात १० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या विक्रीचा वाटा २२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, सरत्या ११ महिन्यांत मुंबई शहरात एकूण एक लाख ३० हजारांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली आहे.

देशातील अन्य प्रमुख शहरांतदेखील अशाच पद्धतीने गृहविक्रीने वेग घेतला आहे.

५०, १८८ कोटी रुपयांची दिल्ली-एनसीआरमध्ये गृहविक्रीने उलाढाल केली आहे.

३८, ५१७ कोटी रुपयांवर हैदराबादमध्ये हाच आकडा पोहोचला आहे

११,३७४ कोटी रुपयांची चेन्नईमध्ये आतापर्यंत गृहविक्री झाली आहे.

९,०२५ कोटी रुपयांची कोलकातामध्ये घरे विकली गेली.

पुण्यातही लक्षणीय उलाढाल

 मुंबईखेरीज पुण्यामध्येही लक्षणीय उलाढाल झाली असून यंदा पुण्यात ३९ हजार ९४५ कोटी रुपये मूल्याची घरे विकली गेली आहेत.

 विशेष म्हणजे, २०२२ मध्ये पुण्यात २०,४०६ कोटी रुपये मूल्याच्या घरांची विक्री झाली होती. 

टॅग्स :मुंबई