Join us  

मुंबईत २०१८च्या तुलनेत यंदा जास्त किमतीच्या घरांची विक्री; नऊ महिन्यांत ४९,३१३ कोटींचे व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 4:22 AM

मुंबईतील घरांची विक्री गतवर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी घटली असली तरी २०१८ शी तुलना केल्यास त्यात चार टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे अ‍ॅनरॉकचे चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितले.

मुंबई : कोरोना संक्रमणाच्या काळात घरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार गडगडले आहेत. मात्र, जानेवारी ते सप्टेंबर, २०१८ या कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात जेवढ्या किमतीच्या घरांची विक्री झाली होती, त्यापेक्षा यंदाच्या वर्षी जास्त विक्री झाल्याची आश्चर्यकारक माहिती हाती आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र यंदाची विक्री कमी आहे. २०१८ मध्ये ४७,२४२ कोटींचे व्यवहार झाले होते. यंदा तो आकडा ४९,३१३ कोटी इतका आहे. गेल्या वर्षी याच व्यवहारांची झेप ६२,९६४ कोटींवर गेली होती.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या अ‍ॅनरॉक प्रॉपर्टीजने देशातील सात प्रमुख शहरांमधील घरांच्या खरेदी-विक्रीचा आलेख आपल्या अहवालात मांडला आहे. त्यातून ही माहिती हाती आली आहे. गेल्या वर्षी या शहरांमध्ये सुमारे २ लाख २ हजार घरांची विक्री झाली होती. त्यांची किंमत साधारणत: १ लाख ५४ हजार कोटी रुपये होती. यंदा त्यात तब्बल ६५,६०० कोटींची घट झाली असून ते व्यवहार जेमतेम ८८,७३० कोटींपर्यंत पोहोचले आहेत. विक्री झालेल्या घरांची संख्यासुद्धा ८७,४६० इतकी आहे. सर्वाधिक ४९,३१३ कोटी रुपये किमतीची घरे मुंबई महानगर क्षेत्रात विकली गेली आहेत. त्या खालोखाल बंगळुरू (१२,५६९ कोटी) आणि एनसीआर (९,४३० कोटी) या शहरांचा क्रमांक लागतो.

मुंबईतील घरांची विक्री गतवर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी घटली असली तरी २०१८ शी तुलना केल्यास त्यात चार टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे अ‍ॅनरॉकचे चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितले. कोरोना दाखल झाल्यानंतर एप्रिल ते जून या तिमाहीत मुंबई महानगरात १२,६९४ कोटी रुपये किमतीच्या घरांची विक्री झाली होती. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत त्यात तब्बल १३४ टक्के वाढ झाली असून हे व्यवहार २९,७३१ कोटींवर गेले आहेत. 

टॅग्स :मुंबईघर