डहाणू, कासा भागात गुटखा विक्री सुरूच
By Admin | Updated: March 31, 2015 22:35 IST2015-03-31T22:35:15+5:302015-03-31T22:35:15+5:30
आरोग्यासाठी घातक असलेल्या गुटखा कोट्यावधीचा महसूल देणारा असला तरी बंदीच्या रूपाने सरकारने त्याच्यावर पाणी सोडले मात्र सरकारचे डोळे चुकवून गुटख्याची

डहाणू, कासा भागात गुटखा विक्री सुरूच
डहाणू : आरोग्यासाठी घातक असलेल्या गुटखा कोट्यावधीचा महसूल देणारा असला तरी बंदीच्या रूपाने सरकारने त्याच्यावर पाणी सोडले मात्र सरकारचे डोळे चुकवून गुटख्याची विक्री शहरासोबतच ग्रामीण खेड्योपाड्यात जोरात सुरू आहे. डहाणूच्या कासा, घोलवड, वानगांव, बोर्डी, तलासरी, तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ठराविक ठिकाणी सर्रास गुटखा विक्री होत असून पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
राज्य सरकारने गुटखाबंदी केल्यानंतर डहाणू तसेच परिसरात गुजरात तसेच कर्नाटक राज्यातून चोरट्या पद्धतीने गुटखा येतो. येथे गुटखा दुप्पट, तिप्पट, भावाने विकला जातो. राज्यात ७२ हजार दुकानांची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १५ हजार ४०० ठिकाणी धाडी घालण्यात येवून बारा कोटीचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे सरकारी आकडेवारीवरून समजले परंतु गेल्या अनेक वर्षात डहाणू तालुक्यात एकही बड्या व्यापारी किंवा दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे डहाण तालुक्यात आर. एम. डी. सारखा अत्यंत महागडा गुटखा प्रति ७० रू. प्रमाणे मिळत असते. हा गुटखा दुबई तसेच नगरहवेली, या केंद्रशासित प्रदेशाच्या दमण येथून येत असल्याची माहिती काही दुकानदारांकडून मिळत आहे.
राज्यातील वेगवेगळ्या संस्थेनी काढलेल्या निष्कर्षानुसार कॅन्सर, तणाव, हृदयरोग या सारखे गंभीर आजार गुटखा सेवनामुळे होतात. समाजाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या या गुटख्यापासून वर्षाला मिळणाऱ्या शंभर कोटी पेक्षा अधिक महसूलावर राज्य सरकारने पाणी सोडूनही ग्रामीण, शहरी भागात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू असल्याने आजची तरूण पिढी या व्यसनात बर्बाद होत असल्याने पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासन डहाणू सारख्या भागात दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान आरोग्याला हानीकारक ठरणाऱ्या गुटख्याची विक्री करणाऱ्या व्यक्तींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच संबंधीतांना दहा वर्षाच्या सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करण्याबाबत सरकार विचार करेल अशी घोषणा अन्न व औषध द्रव्ये प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी नुकतीच विधानसभेत केली. (वार्ताहर)