मुंबईः संगीत, एकता आणि प्रेरणा यांचा सुरेल संगम मुंबईतील प्रतिष्ठित रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये अनुभवायला मिळाला. निमित्त होतं, 'द साउंड स्पेस'च्या 'सख्य २०२५' या कार्यक्रमाचं. संगीत कलेतील एकत्रीकरणाच्या शक्तीचा उत्सव या वार्षिक कार्यक्रमात साजरा करण्यात आला. सामाजिक जाणिवेला, समूह भावनेला प्रोत्साहन देत तरुण कलाकारांमधील कलागुणांवर, त्यांच्या प्रतिभेवर यावेळी प्रकाशझोत टाकण्यात आला.
द साउंड स्पेसच्या संस्थापक कामाक्षी आणि विशाला खुराणा यांनी संगीत शिक्षण सर्वांसाठी सुलभ करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमांचं नियोजन केलं होतं. 'बिहाग सरगम' या हृदयस्पर्शी गायनापासून ते 'एक जिंदरी' या जोशपूर्ण अँथमपर्यंत एकाहून एक सरस गीतांचं आणि संगीताचं सादरीकरण यावेळी दिल्लीतील युवा कलाकारांनी केलं आणि उपस्थित रसिकांची मनं जिंकली. या प्रत्येक सादरीकरणातून जिद्द, सृजनशीलता आणि सर्वसमावेशक संगीत शिक्षणाचं सामर्थ्य प्रकर्षाने जाणवलं.
"संगीत ही एक अशी जादुई कला आहे जी उपचार करू शकते, लोकांना जोडू शकते आणि त्यांच्या उन्नतीचा मार्ग ठरू शकते. 'सख्य'च्या माध्यमातून आम्ही केवळ संगीताचे सौंदर्य साजरे करत नाही, तर आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचेही कौतुक करतो, जे प्रत्येक सूरातून स्वतःची कथा मांडतात", अशी भावना 'द साउंड स्पेस'च्या सहसंस्थापक कामाक्षी खुराणा यांनी व्यक्त केली.
"सख्य हा केवळ एक संगीत कार्यक्रम नाही, तर तो जिद्द, सहकार्य आणि एकतेचा उत्सव आहे. या मंचावर उभ्या असलेल्या प्रत्येक बालकलाकाराची स्वतःची संघर्षगाथा आहे, आणि संगीत हे त्यांचे सशक्त होण्याचे माध्यम ठरले आहे", असं 'द साउंड स्पेस'च्या सहसंस्थापक विशाला खुराणा यांनी नमूद केलं.
संगीत महोत्सवाच्या परिघाबाहेर, 'सख्य 2025' ने द साउंड स्पेसच्या सामाजिक उपक्रमांना देखील प्रकाशझोतात आणले. ग्रामीण आणि वंचित समुदायांपर्यंत पोहोचणाऱ्या मोबाईल म्युझिक क्लासरूम्स पासून ते न्युरोडायव्हर्स लर्नर्ससाठी तयार केलेल्या सर्वसमावेशक संगीत कार्यक्रमांपर्यंत, ही संस्था संगीत शिक्षणाला नवीन उंचीवर नेण्याचे कार्य करत आहे. 'सख्य 2025' मधून जमा होणारा निधी थेट या उपक्रमांसाठी वापरला जाणार असून, नवोदित कलाकारांना त्यांच्या संगीत प्रवासात हातभार लावणार आहे.
कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनीही युवा कलाकारांच्या कौशल्याचे आणि समर्पणाचे कौतुक केले व समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन संगीत आणि कलात्मकतेच्या वृद्धीसाठी प्रयत्न करावेत, असा संदेश दिला. 'द साउंड स्पेस' आपल्या भागीदार, समर्थक आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानते, ज्यांच्या सहकार्यामुळे 'सख्य 2025' एक अविस्मरणीय सोहळा ठरला.