Join us  

मुंबई - नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या साकेत पुलाला तडे, दुरुस्तीचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 3:39 PM

मुंबई - नाशिकला जोडणाऱ्या साकेत पुलाला तडे गेल्याची घटना घडल्यानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले आहे. परंतु यामुळे अवजड वाहनांची वाहतुक बंद करण्यात आली असून येथील वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

ठळक मुद्देदुरुस्तीचे काम वेगातचार तासात दुरुस्तीचा दावा

ठाणे - मुंबई नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या साकेत पुलाला रात्री तडे गेल्याने येथील वाहतुकीचा वेग मंदावला होता. मंगळवारी सकाळी राष्ट्रीय  महामार्गाच्या अधिकाऱ्यानी या पुलाची पाहणी केल्यानंतर तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. परंतु या कामामुळे मुंबईकडे येणारी अवजड वाहनांची वाहतुक भिवंडी, कळवा मार्गावरुन वळविण्यात आल्याची माहिती ठाणे वाहतुक पोलिसांनी दिली.मुंबई - नाशिक महामार्गाला जोडणारा साकेत पुल हा एक महत्वाचा दुवा मानला जातो. परंतु रात्री या पुलाच्या नाशिकहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या भागाला तडे जाऊन तेथील डांबर निखळल्याचे निर्दशनास आले. त्यानंतर या पुलावरील अवजड वाहनांची वाहतुक भिवंडी तसेच कळवा मार्गे वळविण्यात आली. त्यानंतर सकाळपासून येथे वाहतुक पोलिस तैनात करण्यात आले होते. ज्या ठिकाणी तडे गेले होते, तो भाग वगळून बाजूने वाहतुक सुरु होती. परंतु वाहतुकीचा वेग मंदावला होता. अवजड वाहनांना मात्र मोठा वळसा घालून घोडबंदर मार्ग आणि उरण मार्ग गाठावा लागला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच राष्ट्रीय  महामार्गाचे अधिकाऱ्यानी घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीनंतर हा पुल वाहतुकीसाठी योग्य असल्याचे स्पष्ट केले. मुंबई नाशिक महामार्गावर साकेत येथील पुलाला गेलेला तडा सध्या स्टीलप्लेट टाकून बुजविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता महाजन यांनी दिली. पुलावरील रस्त्याला पडलेल्या भेगेमुळे पुलाला धोका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर लागलीच खालील बाजूने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येऊन चार तासात हे काम पूर्ण होईल असा दावा देखील त्यांनी केला.या पुलाला गेलेल्या तड्यामुळे मुंबईकडे येणारी अवजड वाहनांची वाहतुक भिवंडी तसेच कळवा मार्गे वळविण्यात आल्याची माहिती वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक मनोहर आव्हाड यांनी दिली. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर वाहतुक सुरळीत सुरु केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.या पुलाच्या केवळ मुंबईच्या दिशेलाच रस्त्याला तडे गेले नसून नाशिककडे जाणाऱ्या भागाला देखील तडे गेल्याचे, खड्डे पडल्याने दिसून येत आहे. जॉईन्टमध्ये तडे गेल्याचे दिसून येत आहे.वेळीच दखल घेणे अपेक्षित होते...चौकट - कल्याण भागात राहणारे दक्ष नागरीक योगेश दळवी यांनी दोन वर्षापूर्वी या पुलाला तडे गेल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिली होती. त्यानंतर या पुलाची डागडुजी करण्यात आली होती. परंतु दोन महिन्यानंतर पुन्हा कॉंक्रीट उखडल्याचे आणि तडे गेल्याचे त्यांच्या निर्दशनास आले होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी संबधींत विभागाला याची माहिती दिली होती. परंतु त्यांची दखल या विभागांनी घेतलीच नाही. त्यामुळेच आज ही परिस्थिती ओढावल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकामहामार्ग