साहेब, आता भाजपबरोबरच दहा वर्षे

By Admin | Updated: September 18, 2014 00:19 IST2014-09-18T00:15:19+5:302014-09-18T00:19:15+5:30

इच्छुकांचे पक्षनेतृत्वांना साकडे : कार्यकर्त्यांनाही घातल्या जाताहेत पायघड्या

Saheb, now ten years with BJP | साहेब, आता भाजपबरोबरच दहा वर्षे

साहेब, आता भाजपबरोबरच दहा वर्षे

संतोष पाटील - कोल्हापूर -बदलत्या राजकीय घडामोडीनुसार तत्काळ बदलणाऱ्यांसाठी सध्या सुगीचे दिवस आहेत. विधानसभा व महामंडळासाठी इच्छुक असणाऱ्यांची भाजपमध्ये प्रवेशाची झुंबड उडाली आहे, तर राजकीयदृष्ट्या फार महत्त्वाकांक्षा नसतानाही शहर व जिल्ह्याच्या राजकारणात सत्तेच्या सोपानावर असलेल्या पक्षाच्या सावलीत आपले वजन अबाधित राहावे यासाठी काहींनी ‘साहेब...दहा वर्षे भाजपमध्येच राहणार’ असा निरोप धाडून वरातीमागे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात १९९५ साली प्रथमच सत्तांतर झाले. त्यावेळी आबा-आज्यापासून कॉँग्रेसचा झेंडा खांद्यावर असणारे अनेक कार्यकर्ते भगव्याच्या वळचणीला गेले होते. यंदा राज्यात सत्तांतराची चाहूल अनेकांना लागली. काळाची पावले ओळखत भाजपची वाट अनेकांनी धरली. शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचा मोठा संच असल्याने त्यामानाने ‘स्पेस’ असलेल्या भाजपकडे कार्यकर्त्यांचा मोठा ओढा आहे. यामध्ये नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या मोठी आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. मात्र, भाजपच्या सत्तेच्या ताकदीच्या आडाने अनेकांचा काटा काढायचा आहे. भाजपची सत्ता केंद्रात आहे. राज्यातही सत्ता येण्याची शक्यता आहे. या ताकदीवर येत्या पाच वर्षांत राजकीय पोळी भाजण्याचा अनेकांचा डाव आहे. कधी नव्हे शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते व नेत्यांची पोकळी भरून निघत असल्याने भाजप नेतृत्वही अशा कार्यकर्त्यांना पायघड्या अंथरताना दिसत आहे.

बिन टाक्यांची शस्त्रक्रिया
भाजपकडून कसलीही अपेक्षा नाही. कोणतेही लाभाचे पद नको आहे. तरीही पुढील किमान दहा वर्षे पक्षाबरोबरच एकनिष्ठ राहणार असल्याचे आश्वासन पक्षाच्या राज्यातील नेतृत्वाला जिल्ह्यातील अनेक मोठ्या कार्यकर्त्यांनी दिले आहेत. पक्षाला फुकटची ताकद मिळत असल्याने अशा कार्यकर्त्यांना हेरून मुद्दामहून संपर्क साधला जात आहे. ‘सत्ता आपलीच आहे, या तुम्ही. गाडी भरत आली आहे. पुढचं आम्ही बघतो’, असा निरोपही धाडला जात आहे. गाडी भरली तरी गाडीच्या टपावरही बसण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. कसलीच अपेक्षा नाही. मात्र, काहींची बिन टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठीच भाजपच्या वाटेवर असल्याची बोलकी प्रतिक्रिया एका नगरसेवकाने यानिमित्त दिली.

Web Title: Saheb, now ten years with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.