सागर विहार झाले चकाचक

By Admin | Updated: February 4, 2015 01:12 IST2015-02-04T01:12:43+5:302015-02-04T01:12:43+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाने वाशीचा सागर विहार परिसर स्वच्छ झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या परिसराला सोमवारी चकाकी मिळाली.

Sagar Vihar became dazzling | सागर विहार झाले चकाचक

सागर विहार झाले चकाचक

सूर्यकांत वाघमारे-नवी मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाने वाशीचा सागर विहार परिसर स्वच्छ झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या परिसराला सोमवारी चकाकी मिळाली. मात्र पालिकेच्या स्वच्छतेचा हा केवळ दिखाऊपणा न राहता या ठिकाणी कायम सफाई केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वाशीचा सागर विहार परिसर हा पर्यटनाकरिता विकसित करण्यात आला आहे. खाडीकिनारा आणि लगतच असलेले उद्यान यामुळे तेथे मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी होत असते. पर्यटकांसाठी तेथे एक कँटिन व बैठक व्यवस्थादेखील करण्यात आलेली आहे. परंतु देखभाल दुरुस्तीअभावी सध्या या सुविधा केवळ नाममात्र आहेत. सन १९९४ दरम्यान वाशी ते मुंबई या सागरी मार्गावर हॉवरक्राफ्ट सेवा देखील सुरु करण्यात आली. त्या काळात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण देखील या ठिकाणी झाले. त्यामुळे वाशीतले एकमेव पर्यटन स्थळ असलेल्या सागर विहार परिसराला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत होता.
कालांतराने हॉवरक्राफ्ट सेवा बंद झाल्यापासून हा परिसर संबंधित सर्वच प्रशासनांकडून दुर्लक्षित झाला आहे. डागडुजी तसेच स्वच्छतेअभावी तेथे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे. आजही खाडी किनाऱ्याहून केवळ सूर्यास्ताचा देखावा पाहण्यासाठी अनेक जण तेथे जमत असतात. या सर्व पर्यटकांना सोमवारी तेथे झालेला बदल पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. खाडी किनारी पडलेल्या मोडक्या बोटी हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्याशिवाय इतरत्र पडलेले निर्माल्य, कचरा देखील हटवण्यात आला. खारफुटीलगत तारेचे कुंपण घालून त्याला रंगरंगोटी करण्यात आली. हे चित्र पाहून तेथे जणू सोहळाच होणार असल्याचा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला होता. अखेर हे सर्व केवळ मुख्यमंत्र्यांना प्रभावित करण्यासाठीच झाल्याचे स्पष्ट झाले. फडणवीस बोटीने नवी मुंबईत येणार असल्याने वन विभाग आणि महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले होते. (प्रतिनिधी)

सागरी सुरक्षा क्षेत्रांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांना कोणतीही बाधा नको याकरिता परिसर स्वच्छ करण्यात आला. मात्र त्या ठिकाणाहून उचललेला कचरा हा नव्याने घातलेल्या कुंपणापलीकडे खारफुटीमध्येच टाकण्यात आला आहे. त्यासोबत त्या ठिकाणचे जुने निर्माल्य कलश खारफुटीमध्ये टाकण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या चाहुलीने पालिकेने या विभागाची स्वच्छता केली आहे. खारफुटीत टाकण्यात आलेल्या निर्माल्य कलशामुळे आता पर्यटकांना कचरा टाकण्याचा पर्याय राहिला नाही. मुख्यमंत्र्यांच्या सोयीसाठी केलेल्या या कामांमुळे मात्र नागरिकांची गैरसोय झाली.

Web Title: Sagar Vihar became dazzling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.