अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने राज्यातील ३५० किल्ल्यांवर भगवा फडकणार

By सचिन लुंगसे | Published: October 27, 2023 06:45 PM2023-10-27T18:45:21+5:302023-10-27T18:45:33+5:30

२६ जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Saffron will be hoisted on 350 forts in the state on behalf of All Maharashtra Climbing Federation | अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने राज्यातील ३५० किल्ल्यांवर भगवा फडकणार

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने राज्यातील ३५० किल्ल्यांवर भगवा फडकणार

मुंबई : २०२३-२४ वर्ष हे हिंदवी स्वराज्याचे ३५० वे वर्ष असून, या निमित्ताने महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध ३५० गडकिल्ल्यांवर तिरंगा व स्वराज्याची भगवी पताका अर्थात भगवा ध्वज फडकविण्याचा तसेच शिवप्रतिमा पूजनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. २६ जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वार्षिक कार्यकारिणीमध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यकारी अध्यक्ष ऋषिकेश यादव व सचिव डॉ. राहुल वारंगे यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. हा उपक्रम अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या सर्व जिल्हा शाखा, गिर्यारोहण संस्था, शिवप्रेमी संस्था यांच्या माध्यमातून आणि शिवप्रेमी कार्यकर्ते यांच्या सहभागातून संपन्न होणार आहे.

किल्ल्यांची वेगवेगळ्या विभागात यासाठी विभागणी करण्यात आली असून विभाग निहाय ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील, जगाच्या कानाकोपऱ्यातील शिवभक्तांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. यामध्ये महासंघाकडे नाव नोंदणी करून आपल्या जिल्ह्यातील किल्ल्यावर जाऊन या उपक्रमामध्ये सहभागी होता येणार आहे, अशी माहिती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे सह-सचिव राहुल मेश्राम यांनी दिली.

स्वराज्य, त्याची साक्ष देणारे गडकिल्ले व साहसाची सांगड घालणारे कडे कपारीतील निसर्ग सौंदर्य; या सर्वांना एका धाग्यात गुंफणारा हा उपक्रम आहे. गिर्यारोहण, साहस व शिवरायांचा जाज्वल्य इतिहास यांची सांगड अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ नेहमीच घालत असतो व त्यातून नवनवीन अभिनव उपक्रम राबवत असतो. हा देखील त्यांपैकीच एक उपक्रम आहे.
- उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ

Web Title: Saffron will be hoisted on 350 forts in the state on behalf of All Maharashtra Climbing Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.