Join us  

राज्यपालांच्या अभिभाषणाचं मराठी भाषेत अनुवाद न झाल्याचं दुःख- धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 5:05 PM

राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. सेंट्रल हॉलमध्ये भाषण करत असताना राज्यपालांनी मराठीतून सुरुवात करताना सर्व सदस्यांना आनंद झाला.

मुंबई- राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. सेंट्रल हॉलमध्ये भाषण करत असताना राज्यपालांनी मराठीतून सुरुवात करताना सर्व सदस्यांना आनंद झाला. पण त्यानंतर मराठी भाषेत अनुवाद न झाल्यामुळे तेवढंच दुःखही झाले. अनुवादक कुणी आणायचा ? जबाबदारी कुणाची? मंत्रीमहोदय स्वतः अनुवादनासाठी जाऊन बसले. मराठी भाषेचा अपमान झाल्यामुळे आम्हाला खेद वाटतोय, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.ते म्हणाले, राज्यपालांनी दुसरा मुद्दा काढला की, माझे शासन छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिराव फुले, शाहू महाराज यांनी घालून दिलेले आदर्श अमलात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. 2014 साली छत्रपती का आशीर्वाद ही भाजपाची घोषणा लोकप्रिय झाली होती. त्यातूनच त्यांनी शिवस्मारकाचे भूमिपूजन केले. तेव्हाच्या आणि आताच्या राज्यपालांच्या भाषणात फरक आहे. तेव्हा छत्रपतींचे आंतरराष्ट्रीय स्मारक होते, यावर्षीच्या भाषणात फक्त महाराजांचा अश्वारूढ पुतळा उरला आहे, आंतरराष्ट्रीय स्मारक नाही. हे भाषण सरकारतर्फे राज्यपालांना दिले जाते.देशाचे पंतप्रधान मोदीजी स्वतः शिवस्मारक आणि इंदू मिलच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी आले होते. तसेच फुलेंचा सन्मान करण्याचीही भाषा सरकार करते, मात्र दुसर्‍या बाजूला 1300 शाळा बंद करते. सीमेवर शहीद झालेल्या जवानांसाठी स्व. बाळासाहेबांच्या नावाने 'शहीद सन्मान योजना' काढली. एका बाजूला सत्ता पक्षाचे सदस्य सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात, ज्यामुळे सभागृह बंद पडते. कर्नाटकच्या सीमेवरील मराठी बांधव अखंड महाराष्ट्रात सामील होण्यासाठी आंदोलन करत आहेत. राज्यातील एक मंत्री कर्नाटकात जाऊन कानडी गोडवे गातात. मग राज्यपालांच्या अभिभाषणात त्या मराठी बांधवांचे प्रश्न का मांडता.शिवस्मारकासाठी नियमाप्रमाणे ज्या पर्यावरणाच्या बाबतीतल्या परवानगी घेणे आवश्यक होते. त्या घेतल्या नसल्याचा आक्षेप उच्च न्यायालयाने नोंदवला आहे. आम्हाला शंका आहे की, मराठा आरक्षण जसे न्यायालयीन प्रक्रियेत गेले. तसेच हे शिवस्मारकसुद्धा असेच रखडले जाईल का?, भाजपाचा उपमहापौर छिंदमने अपमानजनक, घाणेरडी अशी भाषा महाराजांसाठी वापरली. सरकारने साधा निषेध नोंदविला नाही. ट्विटरवर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या सरकारने एक ट्विट तरी करायचे होते. मात्र तेही केले नाही. हे महाराजांवरचे बेगडी प्रेम आहे. स्वप्न दाखवावे ते भाजपानेच. राज्यपालांनी 2025 मध्ये राज्याची अर्थव्यवस्था 1000 अब्ज डॉलरची करायची असल्याचे सांगितले. नोटा, पैसा गेल्यानंतर कदाचित नीरव मोदी डॉलरमध्ये गुंतवणूक आणणार असेल. लोकांना स्वप्न दाखवणे आता थांबवा.

टॅग्स :धनंजय मुंडे